बांगलादेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून 16 ठार, 30 जखमी

बांगलादेशमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये 30 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राजधानी ढाकापासून 63 किलोमींटर अंतरावर दक्षिण मदारीपूर जिल्ह्यात सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ढाकाहून निघालेल्या इमात परिवहनच्या (Emad Paribahan) बसला रविवारी सकाळी मदारीपूरच्या कुटुबपूर भागातील पद्मा पुलाजवळ दरीत कोसळली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जखमी झाले. अपघाताची माहिती मिलताच अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे महामार्ग पोलीस स्थानकाचे अधिकारी अबू नईम मोहम्मद मोफजेल हक यांनी सांगितले.