
सामना प्रतिनिधी । मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी बंजारा समाज 40 उमेदवार मैदानात उतरवणार असून त्यादृष्टीने समाजाने जय्यत तयारी सुरू केली आहे. बंजारा समाजाचे संत धावजी बापू पुण्यभूमी शांतीस्थळ, अक्कलकोट येथे 7 जूनला राजकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी 40 उमेदवार एकत्र येऊन राजकीय भूमिका ठरवणार आहेत.
राजकारणात बंजारा समाजाने जास्तीत जास्त सहभाग घेणे गरजेचे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत बंजाराबहुल मतदार संघ असेल अशा ठिकाणी गोर बंजारा समाजाने निवडणुकीसाठी उभे राहावे. अशा सर्व उमेदवारांना गोर बंजारांना धर्मपीठ संपूर्ण ताकदीनिशी निवडून आणेल असा ठराव धर्मपीठ पोहरादेवी येथे सर्वानुमते करण्यात आलेला आहे अशी माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड यांनी दिली.
मतदार केंद्र निरीक्षकांची नेमणूक
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक बूथवर चार कार्यकत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन मतदार नोंदणीचे कामही वेगाने सुरू आहे. अशाप्रकारे‘ ‘अब की बार बंजारों के साथ’ सरकार हा नारा देत बंजारा समाज संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचेही राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी 40 विधानसभा मतदारसंघांचा झंझावाती प्रचारदौराही सुरू केला असून मतदारसंघनिहाय भेटी, बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांचे प्रशिक्षण तसेच इच्छुक बंजारा समाजातील उमेदवारांच्या चाचपण्याही सुरू आहेत.




























































