बँक खात्यावर डल्ला मारणारा अटकेत  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 प्रवाशाचे एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्या चोरटय़ाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद गौस मेहबूब शेख असे त्याचे नाव आहे. चोरीच्या गुह्यात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे वरळी येथील रहिवासी असून ते सात दिवसांपूर्वी भाईंदरला जात होते. भाईंदरला जाण्यासाठी त्यानी दादर येथून लोकल पकडली. लोकल बोरिवलीच्या दिशेने जात असताना त्यांना मोबाईलवर बँकेतून पैसे काढल्याचा मेसेज आला. अज्ञात चोरटय़ाने पाकिटातून एटीएम चोरून पैसे काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली.

बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला.  तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचदरम्यान बोरिवली रेल्वे पोलिसांनी मोहम्मदला कांदिवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने तक्रारदारांचे पाकीट चोरल्याची कबुली दिली. मोहम्मदने तक्रारदारांचे प्रवासात पाकीट चोरल्यानंतर तो वांद्रे येथे उतरला. वांद्रे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 4 येथील कचरापुंडीत त्याने ते चोरलेले पाकीट टाकले. त्याने एटीएम कार्डमधून काढलेले पैसे कोणाला दिले याबाबत बोरिवली रेल्वे पोलीस तपास करत आहेत.