
सरकारी बँकांच्या तिजोरीला घोटाळ्यांची वाळवी लागल्याचे उघडकीस आले आहे. देशातील 18 सरकारी बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जूनदरम्यान तब्बल 31 हजार 898 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. 2480 प्रकरणांमध्ये हा गैरव्यवहार झाला आहे.
खासगी बँकांच्या स्पर्धेबरोबरच घोटाळ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे सरकारी बँका डबघाईला आल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी सरकारी बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती रिझर्व्ह बँकेकडे मागितली होती. त्यांच्या अर्जाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने 18 सरकारी बँका कोटय़वधींच्या घोटाळ्यांमुळे बेजार झाल्याची धक्कादायक माहिती उघड केली. हे गैरव्यवहार कोणत्या प्रकारचे आहेत तसेच त्यात बँका आणि ग्राहकांचे किती नुकसान झाले, याचा तपशील मात्र आरबीआयने उघड केलेला नाही.

























































