मुंबईचा बाप्पा पोहोचणार साता समुद्रापार; काऊन्सुलेट जनरल्ससाठी प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांची विशेष टूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उंच गणेशमूर्ती, भव्यदिव्य देखावे, तेवढीच सुबक आणि आकर्षक सजावट यामुळे मुंबईच्या बाप्पांना पाहाण्यासाठी देशविदेशातूनही पाहुणे येत असतात. गणेशोत्सवाचा हा थाटमाट आणि प्रसिद्ध बाप्पांची कीर्ती आता साता समुद्रापार नेण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून ‘एमटीडीसी’ने पहिल्यांदाच मुंबईत कार्यालये असलेल्या देशोदेशींच्या काऊन्सुलेट जनरल्ससाठी (महावाणीज्यदूत) विशेष बाप्पा टूर आयोजित केली आहे. या विशेष टूरच्या माध्यमातून आतापर्यंत 11 काऊन्सुलेट जनरल्ससह त्यांच्या पूर्ण टीमने बाप्पांचे दर्शन घेतले असून 7 सप्टेंबरला होणाऱ्या टूरमध्ये आणखी 7 काऊन्सुलेट जनरल्स आणि त्यांची टीम सहभागी होणार आहे.

महाराष्ट्राचा गणेशोत्सव देशभरात नावाजला जातो. मोठ्या थाटामाटात साजरा होणाऱ्या या उत्सवात ठाणे, पुणे, नागपूरसह मुंबईतील गणेशोत्सव पाहायला देशविदेशातील पाहुणे येत असतात. परदेशी पाहुण्यांनाही बाप्पांचे विशेष आकर्षण असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील काऊन्सुलेट जनरल्ससाठी विशेष टूर राबवली आहे. मुंबईत राहूनही गणेशोत्सवाच्या काळात बाप्पांचे दर्शन घेता येत राज्याच्या पर्यटन विभागाने काऊन्सुलेट जनरलसाठी ही विशेष टूर सुरू केली. त्यासाठी पर्यटन विभागाने तीन एसी बस ठेवल्या आहेत. आतापर्यंत गणेशगल्ली, लालबागचा राजा, वडाळ्याचा जीएसबी अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक, मिलिंद बोरीकर आणि पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

देशी टूर ऑपरेटर्ससाठी फॅम टूर
गणेशोत्सव देशाच्या कानाकोपर्यातही पोहोचावा, यासाठी पर्यटन विभागाने कंबर कसली असून दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये प्रसार केला जाणार आहे. त्यासाठी टूर ऑपरेटर्सबरोबर बोलणी करून आतापर्यंत नोंदणी केलेल्या 32 टूर ऑपरेटर्ससाठी फॅम टूरचे आयोजन करण्यात आले आहे.

विसर्जन पाहाण्यासाठी विशेष पॅव्हेलियन
मुंबईत गिरगाव चौपाटी येथे शहरातील सर्व उंच गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. हे विसर्जन पाहाता यावे, यासाठी चौपाटीवर सेलिब्रेटी, देशीविदेशी विशेष पाहुणे, मान्यवर, बॉलिवूड स्टार्स यांच्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने विशेष पॅव्हेलियन बांधले आहे. या पॅव्हेलियनमध्ये परदेशी पाहुण्यांसाठी विसर्जन पाहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

इको फ्रेंडली गणपतीसाठी पुढाकार
केंद्र सरकारने पीओपीवर बंदी घालण्याआधीच पर्यावरण संवर्धनात पुढाकार घेऊन प्रदूषण टाळणार्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणार्या मान्यवर, सेलिब्रेटींचा आदर्श समाजासमोर यावा, यासाठी पर्यटन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जॅकी श्रॉफ इतर सेलिब्रेटींची मदत घेऊन त्याबाबतचे व्हिडिओ पर्यटन विभागाच्या साईटवर प्रसारित करण्यात येत आहेत.