नाभिक समाजाचा संताप, दानवेंच्या फोटोला जोड्याने हाणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकार हे तिरुपती बालाजी येथील न्हाव्यासारखे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले होते. याबाबत राज्यातील नाभिक समाजात तीव्र संतापाची भावना पसरली आहे. रायगड जिल्हा नाभिक समाजातर्फे सोमवारी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सहा दिवसांत दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी दानवेंच्या फोटोला जोडे मारून त्याच्या पुतळ्याचे मोर्चेकऱ्यांनी दहन करून निषेध व्यक्त केला.

अलिबागमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. एसटी स्थानक, अरुणकुमार वैद्य शाळा, न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचला. यावेळी हिराकोट तलावाजवळ मोर्चाला अडवण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. दानवेंच्या निषेधार्थ घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातून शेकडो नाभिक समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते.

स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य पूर्व काळात नाभिक समाजाच्या वीरांनी देशसेवा केली आहे. दानवे हे दानव असून त्यांनी समाजाची निंदा केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाभिक समाजाबाबत अपशब्द वापरले होते. मात्र त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. रावसाहेब दानवे यांनीही समाजाची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा रायगड जिल्हा नाभिक समाज संघ अध्यक्ष दिनेश मोरे यांनी दिला.