
‘इक दिवार पे चाँद टिका था, मैं समजा के तुम बैठे हो,’ अशी भावगर्भ शायरी लिहितानाच – ‘लोग टूट जाते है इक घर बनाने में, तुम तरस नहीं खातें बस्तिया जलाने में’, अशी अर्थखोल वेदना व्यक्त करीत उर्दू अदबच्या क्षितिजावर आणि रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेला… मनामनांत मानवतेची जाणीव पेरणारे महान शायर बशीर बद्र आज मर्त्य मानवांचे जग सोडून गेले. ‘इर्शाद… मुकर्रर्र, अशा घोषात एका मागून एक शेर पेश करीत मैफलीला चार चाँद लावणारा हा मनस्वी शायर ईदच्याच दिवशी ‘चांद के पार’ निघून गेला. जातीय दंग्यात स्वतःचे घर गमावल्यानंतर त्याच दंग्याच्या राखेतून बशीर बद्र यांनी प्रेम, बंधुभाव आणि शांतीची शब्दफुले वेचली. उर्दू शायरीचे एक देदीप्यमान युग संपले.
आसमां भर गया है परिंदोंसे…
पेड कोई हरा गिरा होगा
बशीर बद्र हे 91 वर्षांचे होते. अनेक वर्षांपासून ते स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. त्यांच्या पत्नी डॉ. राहत या त्यांना गझला वाचून दाखवायच्या. त्यावर ते ‘इरशाद’ म्हणायचे. काही दिवसांपासून बशीर यांची प्रकृती अधिकच खालावली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत त्यांचे पुत्र तय्यब यांनी माहिती दिली. बशीर बद्र यांच्या निधनाचे वृत्त येताच साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली.
बशीर बद्र यांचे मूळ नाव सय्यद मोहम्मद बद्र. उत्तर प्रदेशात अयोध्या येथे त्यांचा जन्म झाला होता. बालपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी शेरोशायरी लिहिण्यास सुरुवात केली होती. अलिगढ विद्यापीठातून त्यांनी बीए, एमए आणि त्यानंतर उर्दू साहित्यात पीएच.डी. केल्यानंतर याच विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणूनदेखील सेवा दिली. त्यानंतर ते मेरठ महाविद्यालयात उर्दू विभागप्रमुख म्हणून सुमारे 17 वर्षे कार्यरत होते. मेरठ दंगलीमध्ये त्यांचे घर जळून खाक झाल्यानंतर ते काही काळ बरेली येथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते भोपाळ येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी डॉ. राहत यांच्याशी विवाह केला. वर्ष 1999 मध्ये त्यांचा ‘पद्मश्री’ आणि साहित्य अकादमी पुरस्कारने गौरव करण्यात आला होता.
मुलींसाठी खास शेर
“वो शाख़ है न फूल, अगर तितलियाँ न हों वो घर भी कोई घर है जहाँ बच्चियाँ न हों।’’ हा शेर बशीर बद्र यांनी मुलींवर लिहिला होता.
फाळणीवर लिहिले अजरामर शेर
देशाच्या फाळणीवर बशीर बद्र यांनी अनेक शेर लिहिले होते. ते आजही गझलप्रेमींच्या हृदयात कायम घर करून आहेत. त्यांनी लिहिलेला एक शेर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शिमला करारावेळी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांना सुनावला होता. ‘दुश्मनी जमके करो, लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त बन जाएं तो शर्मिन्दा ना हों.’
उर्दू भाषा आणखी गरीब झाली – जावेद अख्तर
बशीर बद्र यांच्या निधनावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले की, आज आपली उर्दू भाषा आणखी गरीब झाली आहे. एक अत्यंत सुमधुर शायर बशीर बद्र नेहमीसाठी आपल्या मैफलीतून निघून गेले आहेत. हे शायर आणि त्यांची शायरी आपल्या आठवणींमध्ये नेहमी जिवंत राहील, अशा शब्दांमध्ये जावेद अख्तर यांनी बशीर बद्र यांना सुमनांजली अर्पण केली.




























































