तुम्हाला घरापर्यंत सुरक्षित नेण्याची जबाबदारी आमची, बीसीसीआयकडून IPL मधील परदेशी क्रिकेटपटूंना हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याचे पडसाद हिंदुस्थानात सुरू असलेल्या आयपीएलवरही उमटले आहेत. केन रिचडर्सन, अॅडम झाम्पा व अॅण्ड्रय़ू टे या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी कोरोनाचा धसका घेत आयपीएलमधून माघारही घेतली आहे. आगामी दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियासह इतर देशांतील क्रिकेटपटूही या स्पर्धेमधून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीसीसीआयने मात्र कोरोनाच्या दहशतखाली असलेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे. याप्रसंगी आयपीएल संपल्यानंतर मायदेशात कसे पोहोचता येईल याची चिंता करण्याची गरज नाहीए. परदेशी क्रिकेटपटूंना घरापर्यंत नेण्याची जबाबदारी आमची असल्याचे स्पष्ट करीत बीसीसीआयने परदेशी क्रिकेटपटूंचे टेन्शन कमी केले आहे.

विमानसेवा स्थगित, खेळाडूंनी घेतला धसका

हिंदुस्थानात कोरोना वाढतो आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून हिंदुस्थानातून येणाऱया विमानसेवेवर येत्या 15 मे पर्यंत स्थगिती लावण्यात आली आहे. याचा आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धसका घेतला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे 14 खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये स्टीवन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स या प्रमुख खेळाडूंसह रिकी पाँटिंग, सायमन कॅटीच, डेव्हीड व मायकेल हस्सी या स्टार प्रशिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लीनने ऑस्ट्रेलियाकडे परतीसाठी चार्टर्ड विमानाची मागणीही केली होती.

परिस्थितीवर लक्ष, सरकारसोबत बोलणी सुरू

बीसीसीआयचे सीओओ हेमांग अमीन यावेळी म्हणाले की, आयपीएल संपल्यानंतर घरी कसे पोहाचणार, हा प्रश्न परदेशी खेळाडूंच्या मनामध्ये येणे साहजिकच आहे. पण बीसीसीआयने सर्वांना मायदेशात सुरक्षित नेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदुस्थानसह इतर देशांतील कोरोना परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. केंद्र सरकारसोबत या विषयावर बोलणीही सुरू आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

हॉटेलबाहेरच्या पदार्थांवर बंदी

बीसीसीआयकडून आयपीएलमधील प्रत्येक संघासाठी जैव सुरक्षित वातावरण (बायो बबल) करण्यात आले आहे. त्यामुळे या संघांशी संबंधित सर्वांनाच हॉटेल ते स्टेडियम एवढय़ाच मर्यादेत राहावे लागते आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर आता खेळाडू वास्तव्य करीत असलेल्या हॉटेलबाहेरील पदार्थांनाही तेथे एण्ट्री देण्यात आलेली नाही. फक्त वास्तव्य असलेल्या हॉटेलमधील जेवण खेळाडूंना देण्यात येत आहे, असेही हेमांग अमीन यावेळी म्हणाले.

तुम्ही तुमचं बघा – स्कॉट मॉरीसन

आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आयपीएल संपल्यानंतर मायदेशात येण्यासाठी सुविधा उपलब्ध करा अशी मागणी केली होती. यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन म्हणाले, आयपीएल ही खासगी स्पर्धा आहे. याचा ऑस्ट्रेलियन दौऱयाशी काही संबंध नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात येण्यासाठी स्वतः मार्ग काढावा लागणार आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन हे सातत्याने आयपीएलमधील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संपर्कात आहेत.