सुनील जोशी निवडणार टीम इंडियाचा संघ, निवड समितीच्या चेअरमनपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांची सीनियर निवड समितीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. मदनलाल, रुद्र प्रताप सिंग व सुलक्षणा नाईक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीकडून बुधवारी दक्षिण विभागातील सुनील जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हरविंदर सिंग यांचीही निवड समितीत वर्णी लागली आहे. एम. एस. के. प्रसाद व गगन खोडा यांचा करार संपल्यानंतर या दोन जागांसाठी 40 उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यामधून या दोन व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.

क्रिकेट सल्लागार समितीकडून सुनील जोशी, हरविंदर सिंग, व्यंकटेश प्रसाद, राजेश चौहान व एल. एस. शिवरामकृष्णन यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एम. एस. के. प्रसाद हे दक्षिणेतील असल्यामुळे त्यांच्याऐवजी दक्षिणेतील सुनील जोशी यांची, तर गगन खोडा यांच्याऐवजी हरविंदर सिंग या मध्य विभागातील व्यक्तीची निवड करण्यात आली.

आगरकर, मोंगिया यांना नंतर संधी

अजित आगरकर व नयन मोंगिया यांनीही पदासाठी अर्ज केले होते, पण जतीन परांजपे, देबांग गांधी व सरणदीप सिंग यांचा करार संपल्यानंतर या दोघांच्या नावाचा विचार करण्यात येणार आहे. तसेच सल्लागार समितीकडून एक वर्षानंतर निवड समितीने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान, निवड समिती सदस्यांची निवड करताना बीसीसीआयकडून कोणताही दबाव टाकण्यात आला नाही, असे मदनलाल यांनी यावेळी सांगितले.