
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या महिला खेळाडूंची वार्षिक करारश्रेणी जाहीर केली. यात नव्या दमाची धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिला करारात बढती देण्यात आली असून, एकदिवसीय व कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिला या वर्षीही ‘ब’ श्रेणीतच ठेवण्यात आले आहे. यंदा ‘बीसीसीआय’ने 19 महिला क्रिकेटपटूंशी वार्षिक करार केलाय. गतवर्षीप्रमाणेच यावेळीही अ, ब व क श्रेणीसाठी अनुक्रमे 50, 30 व 10 लाख रुपये मिळणार आहेत. हिंदुस्थानच्या पुरुष क्रिकेटपटूंना अऔ, अ, ब व क श्रेणीसाठी अनुक्रमे 7, 5, 3 व 1 कोटी रुपये वार्षिक मानधन मिळते.
हरमनप्रीत, स्मृती, पूनमला ‘अ’ ग्रेड
हिंदुस्थानच्या ट्वेण्टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना आणि फिरकीपटू पूनम यादव या तिघींना ‘अ’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. ‘ब’ श्रेणीत एकूण 10 खेळाडूंना स्थान मिळाले असून, मितालीबरोबर अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीसुद्धा याच श्रेणीत आहे. ‘गेल्या दोन वर्षांत शफाली हिंदुस्थानची सर्वाधिक प्रतिभावान फलंदाज म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे तिला ‘क’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत बढती देण्यात आली,’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱयाने सांगितले. मिताली आणि झुलन यांनी ट्वेण्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असून, सध्या त्या एकदिवसीय प्रकारातच हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतात. आता तब्बल सात वर्षांनंतर प्रथमच त्यांना कसोटी सामना खेळण्याचीही संधी मिळणार आहे.
महिलांचा करार कासवगतीने
ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह इतर देशांतही पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत महिला खेळाडूंना वार्षिक करारात कमी मानधन मिळते. मात्र, हे आर्थिक अंतर कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे हिंदुस्थानात पुरुष व महिला क्रिकेटपटूंच्या मानधनातील अंतर वाढतच चालले आहे. 2015-16मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना करारबद्ध केले. त्यावेळी ‘अ’ श्रेणीसाठी महिलांना 15 लाख, तर पुरुषांना एक कोटी रुपये मिळत होते. मात्र, मागील पाच वर्षांत मानधन 7 पटीने वाढले, तर महिलांचे मानधन कासवगतीने 3 पटीनेच वाढलेले आहे.
वार्षिक श्रेणीनिहाय करारबद्ध खेळाडू
‘अ’ श्रेणी (50 लाख) – हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव.
‘ब’ श्रेणी (30 लाख) – मिताली राज, शफाली वर्मा, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज.
‘क’ श्रेणी (10 लाख) – मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल, प्रिया पुनिया, रिचा घोष.






























































