
खेळ आणि भूराजकीय घडामोडींचे पडसाद आता आगामी आयपीएल २०२६च्या हंगामावर उमटू लागले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या फ्रँचायझीला त्यांचा प्रमुख बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून वगळण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या निर्णयाची पुष्टी केली असून, सार्वजनिक तसेच राजकीय दबावामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बांगलादेशमधील सद्यस्थिती, तेथील नागरी असंतोष आणि भारतात उमटत असलेल्या तीव्र प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते.
डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात केकेआरने मुस्तफिजुर रहमानला ९.२ कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील केले होते. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला होता. मात्र नुकत्याच झालेल्या घडामोडींमुळे बीसीसीआयने ‘वेट अँड वॉच’ धोरण सोडून आता कडक भूमिका घेतली आहे. सैकिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, परिस्थितीचा विचार करता केकेआरला मुस्तफिजुरला संघातून वगळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच संघ व्यवस्थापनाला पर्यायी खेळाडूची मागणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कोलकाता नाईट रायडर्सला तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर मोठा फटका बसला आहे. केकेआरने आपल्या गोलंदाजीची जबाबदारी मोठ्या प्रमाणात मुस्तफिजुरवर सोपवली होती. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या ‘कटर्स’चा लाभ घेण्याची संघाची योजना होती. आता त्याच्या अनुपस्थितीमुळे मथीशा पाथिरानावर अतिरिक्त ताण येणार असून, संघातील विदेशी खेळाडूंचे संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. मुस्तफिजुरच्या जागी दर्जेदार पर्यायी खेळाडू शोधणे आणि लिलावातील रकमेचा आर्थिक ताळमेळ बसवणे ही केकेआरसमोरची मोठी आव्हाने ठरणार आहेत.
दरम्यान, या घडामोडींचा परिणाम भारत आणि बांगलादेश यांच्यातील संभाव्य द्विपक्षीय मालिकेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी लांबणीवर टाकलेली ही मालिका यावर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित करण्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संकेत दिले असले तरी बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाबाबत अधिकृत संमती दिलेली नाही. राजकीय परिस्थिती सुधारल्याशिवाय या मालिकेसाठी पुढाकार घेण्याची शक्यता सध्या तरी क्षीण दिसत आहे.
























































