राष्ट्रीय संघात राहायचंय? विजय हजारे खेळणे बंधनकारकl; बीसीसीआयचा हिंदुस्थानी संघातील सर्वांना कडक आदेश

देशांतर्गत क्रिकेट हे आता केवळ नवोदितांसाठी उरलेले मैदान नाही, तर थेट राष्ट्रीय संघातील दिग्गजांसाठीही ते बंधनकारक ठरणार आहे. बीसीसीआयने 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विजय हजारे करंडक स्पर्धेत हिंदुस्थानी संघातील विद्यमान अर्थातच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गजांना किमान दोन सामने खेळणे बंधनकारक असल्याचे फर्मान काढले आहे.

सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अखेरचा टी-20 सामना 19 डिसेंबरला होणार असून, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना थेट पुढील वर्षी 11 जानेवारीला खेळविला जाणार आहे. या मधल्या तीन आठवडय़ांच्या विश्रांतीत खेळाडूंनी ‘आराम’ नव्हे, तर ‘रणांगण’ गाठावे, अशीच बीसीसीआयची ठाम भूमिका आहे. त्यामुळे आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेत विराट, रोहितसह टीम इंडियातील दिग्गजांचे दर्शन घडणार, हे नक्की आहे. या स्टार खेळाडूंच्या उपस्थितीमुळे विजय हजारे स्पर्धेला प्रथमच अनोखे ग्लॅमरच लाभणार नाही तर क्रिकेटप्रेमींची गर्दीही उसळणार, हे सांगायची गरज लागणार नाही.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा आदेश सर्व वरिष्ठ खेळाडूंना कळवला आहे. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील पराभवानंतर देशांतर्गत क्रिकेटकडे पुन्हा गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची शिफारस करण्यात आली होती आणि त्याचाच हा पुढचा टप्पा मानला जात आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजय हजारे स्पर्धेसाठी आपली उपलब्धता आधीच कळवली आहे. ‘आम्हाला काही सिद्ध करायचे नाही’ असा गैरसमज दूर करण्यासाठीच कदाचित ही पुढाकाराची भूमिका असावी. त्याच धर्तीवर शुभमन गिल, जसप्रीत बुमरा, के. एल. राहुल, हार्दिक पंडय़ा आणि सूर्यकुमार यादव यांनाही त्यांच्या-त्यांच्या राज्य संघांकडून किमान दोन सामने खेळण्याची सूचना केली जाण्याची दाट शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार विजय हजारे करंडकाची साखळी फेरी 24 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहेत. खेळाडू आणि त्यांचे राज्य संघ यावर अवलंबून असेल की कोणत्या फेरीत खेळायचे. बीसीसीआयच्या एक्सलन्स केंद्राकडून अनफिट ठरवले गेल्यासच त्यांना न खेळण्याची सूट दिली जाईल. मात्र दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर दुखापतीतून सावरण्यास पुरेसा वेळ मिळेल, असा आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जसप्रीत बुमराह धर्मशाळेत होणाऱया तिसऱया टी-20 सामन्यापूर्वी खासगी कारणांमुळे घरी परतावे लागले. विश्वसनीय सूत्रांनुसार त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती अनुकूल राहिल्यास बुमरा चौथ्या किंवा पाचव्या सामन्यासाठी पुन्हा संघात दाखल होऊ शकतो. देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा प्रतिष्ठा मिळावी, हा या निर्णयामागचा मूळ हेतू आहे. रणजी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली या स्पर्धा केवळ नावापुरत्या नव्हेत, हे दिग्गजांनाही आठवण करून देण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल.