बीसीसीआयने ‘वाडा’च्या अधिकार कक्षेत यावे! धनराज पिल्ले यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने कफ सिरप घेतले आणि बीबीसीआयने त्याच्यावर आठ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली. यानंतर मात्र बीसीसीआयच्या डोपिंग प्रणालीवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. त्यामुळे या प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ने दिग्गज हॉकीपटू धनराज पिल्लेशी संपर्क साधला. याप्रसंगी ते म्हणाले, ‘बीसीसीआय’ ही हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगातील श्रीमंत क्रीडा संस्था आहे. त्यांची स्वतंत्र डोपिंग प्रणाली आहे, पण ‘वाडा’ला जगभरात मान्यता आहे. त्यामुळे बीबीसीआयनेही ‘वाडा’च्या अधिपत्याखाली यायला हवे. बीसीसीआयने ‘वाडा’ आणि ‘नाडा’ यांच्याशी संलग्न व्हायला हवे. हिंदुस्थानातील इतर खेळांच्या संघटनाही त्यांच्याशी संलग्न आहेत, असे स्पष्ट मत पुढे धनराज पिल्ले यांनी व्यक्त केले.

हॉकीमध्ये असा प्रकार घडत नाही

मी खेळत असताना डोप टेस्टसाठी माझेच नाव सर्वात पहिले असायचे. बिनधास्तपणे मी टेस्टला सामोरा जायचो. हॉकीमध्ये डोपिंगमुळे खेळाडू अडचणीत आल्याचा प्रकार दिसून येत नाही. फार क्वचित असे घडते, असे धनराज पिल्ले पुढे म्हणाले

चुकून घडले तर

एखाद्या खेळाडूला सर्दी-खोकला झाला तर तो जी औषधे घेतो त्यामध्ये उत्तेजक द्रव्य असल्याचे त्याला काही वेळा समजत नाही. अशा वेळी त्या खेळाडूचा पाय खोलात जातो, मात्र त्याच्याकडून हे चुकून घडलेले असते. सध्याच्या काळात प्रत्येक क्रीडा संघटना डॉक्टर, फिजिओची नियुक्ती करतात. यामुळे खेळाडू डोपिंगपासून दूर राहू शकतो.

पृथ्वी लहानच, त्याचे भवितव्य उज्ज्वल

पृथ्वी शॉ अजून लहान आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकण्याची करामत केली आहे. बीसीसीआयने त्याच्यावरील बंदी आणखी कमी करायला हवी होती, पण या संकटावर तो नक्की मात करील तसेच जोशात पुनरागमन करील. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे, असा विश्वास धनराज पिल्ले यांनी यावेळी व्यक्त केला.

‘वाडा’च्या डोपिंगची दहशत मनात नको, क्रीडा वैद्यकतज्ञ डॉ. निखिल लाटे यांचा सल्ला

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि धावपटू संजीवनी जाधव हे नामवंत ऍथलीटस् उत्तेजक प्रतिबंधक चाचणीत दोषी आढळल्यावर हिंदुस्थानी क्रीडापटूंनी डोपिंग टेस्टचा धसकाच घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील नामवंत क्रीडा वैद्यकतज्ञ डॉ. निखिल लाटे यांनी क्रिकेटपटू आणि अन्य क्रीडापटूंनी ‘वाडा’ अथवा ‘नाडा’च्या डोपिंग चाचणीची भीती बाळगण्याचे कारण नाही. एखाद्या स्पर्धेच्या तोंडावर अथवा स्पर्धा सुरू असताना आजारी पडल्यास औषध घेताना क्रीडा वैद्यकतज्ञांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या, स्वतःच्या बुद्धीने  कोणतेही औषध घेऊ नका. जागतिक डोपिंग संघटना अथवा राष्ट्रीय डोपिंग संघटनेने बंदी घातलेल्या औषधी रसायनांची माहिती आपल्या क्रीडा महासंघांकडून घ्या. तुमच्यावर पस्तावण्याची वेळ मुळीच येणार नाही, असा दिलासा देणारा सल्ला देशातील नामवंत क्रीडा वैद्यकतज्ञ  डॉ. निखिल लाटे यांनी दिला आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाची  (बीसीसीआय) डोपिंग चाचणीविषयक यंत्रणा खरेच चांगली आहे. तिचा लाभ घेऊन क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या डोपिंग चाचणीला सामोरे जावे. तुम्हाला कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागणार नाही असा विश्वास व्यक्त करून डॉ. निखिल लाटे म्हणाले, बीसीसीआयच्या यंत्रणेत डॉ. व्हेस पेस यांच्यासारखे नामवंत क्रीडा वैद्यकतज्ञ आहेत. त्यांचा सल्ला घेऊन आजारावर औषधे घेतल्यास क्रिकेटपटू उत्तेजक चाचणीत नक्कीच दोषी ठरले जाणार नाहीत, असा विश्वासही डॉ. लाटे यांनी व्यक्त केला.

 ‘वाडा’च्या प्रतिबंधित औषधांच्या यादीवर संघटनेने लक्ष ठेवावे 

जागतिक ऍण्टीडोपिंग संघटना ( वाडा ) आपल्या प्रतिबंधित औषधांच्या यादीत प्रतिवर्षी बदल करीत असते. ती यादी प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये प्रसिद्ध होते. प्रत्येक क्रीडा महासंघाने अथवा क्रीडा संघटनेने वादाच्या त्या यादीवर लक्ष ठेवून खेळाडूंचे प्रबोधन करायला हवे, असे आवाहन करीत डॉ. लाटे म्हणाले, खेळाडूंनीही आपल्या आरोग्याशी निगडित औषधांचे सेवन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास पृथ्वी शॉसारखी आफत अन्य खेळाडूंवर येणार नाही. शिवाय एखादा क्रीडापटू दम्यासाठी एखादे डॉक्टरांनी सुचवलेले औषध घेत असेल तर तशी पूर्वसूचना ‘वाडा’ला दिल्यास अशा खेळाडूंना काही अंशी सूट दिली जाते, मात्र ते औषध  खेळाडूची कार्यक्षमता वाढवणारे नसावे, असे डॉ. लाटे म्हणाले.