
अनंत सोनवणे,[email protected]
हिमालयाच्या तिजोरीतलं एक सर्वोत्तम रत्न म्हणजे ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान… हिमाचल प्रदेशच्या कुलू जिह्यात वसलेलं हे जंगल….
हिंदुस्थानच्या निसर्गवैभवाचा मुकुटमणी म्हणजे हिमालय. देशाच्या सीमांचं रक्षण करण्याबरोबरच देशाच्या नैसर्गिक संपदेचं जतन करण्याची दुहेरी जबाबदारी हिमालय हजारो वर्षे करत आलाय. अशा या सर्वांगसुंदर हिमालयाच्या तिजोरीतलं एक सर्वोत्तम रत्न म्हणजे ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिह्यात बसलेलं हे जंगल युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत 2014 सालापासून स्थानापन्न झालंय! जागतिक पातळीवर अस्तित्व धोक्यात आलेले अनेक वन्य पशु-पक्षी इथं सुखेनैव नांदताना दिसतात. त्यामुळे केवळ हिंदुस्थानातूनच नव्हे, तर अवघ्या जगभरातून वन्यजीवप्रेमी पर्यटक आणि छायाचित्रकार या राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी येत असतात.

ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1984 साली झाली. मात्र त्याला अधिकृतरीत्या राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करायला 1999 साल उजाडावं लागलं. सैंज आणि तीर्थन वन्यजीव अभयारण्यासह एक हजार चौरस किलोमीटरहून अधिक मोठा परिसर या राष्ट्रीय उद्यानाला जोडला गेला. उद्यानाच्या सीमा पीन व्हॅली राष्ट्रीन उद्यान, रुपी भाभा वन्यजीव अभयारण्य आणि कानवर वन्यजीव अभयारण्याला जोडलेल्या आहेत. वर्ल्ड कन्झर्वेशन मॉनिटरिंग सेंटरने वनस्पतींच्या वैविध्याबाबत अग्रेसर अशा हिंदुस्थानातल्या पाच स्थळांमध्ये ग्रट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाचा समावेश केला आहे. पाईन वृक्षांच्या गर्द वनांनी हा प्रदेश बनलेला आहे. इथे आजवर 375 हून अधिक प्रजातींच्या वनस्पतींची नोंद झाली आहे.
समुद्रसपाटीपासून 3500 आणि त्यापेक्षा अधिक उंचीवर वन्यजीवांचं एक अद्भुत विश्व अस्तित्वात आहे, यावर नुसतं वाचून किंवा ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही. दुर्गम वाटांमुळे एवढय़ा उंचीवर पोहोचणंही मुश्कील काम आहे. मात्र साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वन्यजीव उंच प्रदेशातून खालच्या दिशेनं स्थलांतर करतात. त्यामुळे या काळात त्यांचं दर्शन घडू शकतं. आपल्याकडच्या बिबळ्याचा भाऊ म्हणजे ‘स्नो लेपर्ड’ हा या जंगलाचा राजा. बर्फाळ डोंगरातून अवचित डोकावणाऱया खडकांशी बेमालूमपणे जुळणाऱया रंगामुळे हा आपल्यापासून अगदी काही फुटांवर असला तरी पटकन दिसणार नाही आणि दिसला की, नजर त्याच्यावरून हटणार नाही. या स्नोलेपर्डचं दर्शन झालं की, वन्यजीवप्रेमी आपलं जीवन धन्य झालं असं मानतात.

याशिवाय इथं आढळणारी पहाडी बकरी-ब्ल्यू शीप ही या जंगलाची आणखी एक खासीयत. तिथं छायाचित्र मिळवण्यासाठी वन्यजीव छायाचित्रकार प्रदीर्घ प्रतीक्षा करतात. तसंच इथलं हिमालयीन ब्राऊन अस्वल आणि कस्तुरीमृग (मस्क डीअर) हे प्राणीही वन्यजीवप्रेमींच्या आकर्षणाचे विषय आहेत. आतापर्यंत इथं सस्तन प्राण्यांच्या 31 प्रजातींची नोंद झाली आहे.
निसर्गानं बहाल केलेली भौगोलिक दुर्गमता, त्यामुळे अत्यंत मर्यादित मानवी हस्तक्षेप, वनविभाग व स्वयंसेवी संस्थांचे अथक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी दिलेली साथ या साऱयाचा एकत्रित परिणाम म्हणून ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान आजही आपली जैवविविधता जपून दिमाखात उभं आहे. योग्य नियोजन करून इथं अवश्य भेट द्यायला हवी.
ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान
प्रमुख आकर्षण…हिमालयन पक्षी
जिल्हा…कुल्लू, राज्य…हिमाचल प्रदेश
क्षेत्रफळ…1171 चौ.कि.मी., निर्मिती…1984
जवळचे रेल्वे स्थानक…चंदिगढ (296 कि.मी.)
जवळचा विमानतळ…भुंतार-कुल्लू (63 कि.मी.)
निवास व्यवस्था…खासगी हॉटेल्स
योग्य हंगाम…सप्टेंबर ते नोव्हेंबर
सुट्टीचा काळ…नाही
साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही























































