
राज्य सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉलतिकिटांवरील परीक्षेच्या तारखेत चुका असून परीक्षा सेंटरही बदलण्यात आल्याने विद्यार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकलेले नाहीत. नागपूर, नाशिक, बीड, लातूरमधील परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
23 ते 25 एप्रिलदरम्यान राज्यभर ऑनलाईन पद्धतीने बीएड सीईटी परीक्षा घेण्यात आली आहे, अशी नोंद सीईटी सेलच्या वेबसाईटवर आहे. मात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉलतिकिटावर 26 एप्रिल ही तारीख नमूद करण्यात आली आहे. हॉलतिकिटानुसार आज विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेले, मात्र त्यांची परीक्षा कालच झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रही बदलण्यात आले आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले होते. मात्र काही विद्यार्थ्यांनी एसएमएस न पाहता जुन्या परीक्षा केंद्रावर हजेरी लावली त्यामुळे त्यांची परीक्षा हुकली.
ऑनलाईन परीक्षेचे कंत्राट दिलेल्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस
दरम्यान, बीएड सीईटीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ज्या कंपनीला कंत्राट दिले होते त्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. 23 ते 26 एप्रिल रोजी बीएड सीईटी, बी प्लॅनिंग आणि एमपीएड सीईटी घेण्यात आली. 26 एप्रिल रोजी नाशिक, नागपूर, लातूर आणि अमरावती येथील परीक्षा केंद्र परीक्षेच्या तीन दिवस आधी बदलल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
























































