अंबाजोगाई हळहळले, विषबाधेतून तीन चिमुकल्यांचा मृत्यू, आईची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन लेकरांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील वाघझरी येथे घडली. आईची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्युशी झुंज देत आहे. ही गंभीर घटना विषबाधेतून झाली की घातपाताचा प्रकार आहे याचा तपास केला जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील वाघझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे हा शेतमजुरी करून आपले कुटुंब चालवत होता. धारासुरे कुटुंब शुक्रवारी रात्री जेवण करून झोपी गेले. मध्यरात्रीपासून सर्वांनाच उलट्या सुरू झाल्या. शनिवारी सकाळी त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान श्रावणी काशीनाथ धारासुरे (4), साधना काशीनाथ धारासुरे (5) या दोघींचा सकाळी मृत्यू झाला. अवघ्या काही तासात आठ महिन्याचे बाळ असलेल्या नारायण काशीनाथ धारासुरे याचाही दुर्देवी मृत्यू झाला. या लेकरांची आई भाग्यश्री धारासुरे (28) यांची प्रकृती चिंताजनक आहे. धारासुरे कुटुंबाने रात्री कोणता आहार घेतला हे समजू शकले नाही. या दुर्घटनेवेळी कुटुंबप्रमुख काशीनाथ धारासुरे घरी होते की नाही हे ही समजू शकले नाही. दरम्यान या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी रूग्णालयामध्ये धाव घेतली. काशीनाथ धारासुरे हे रूग्णालयामध्ये बसून आहेत.