
पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच 22 वर्षीय प्रेयसीला ऑसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील येळंबघाटात घडल्याचे उघडकीस आले आहे. जखमी तरुणी तब्बल बारा तास रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डय़ात तडफडत पडलेली होती. या घटनेमुळे जिह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपी नांदेड जिह्यातील देगलूर तालुक्यातील गावाकडे येथे पळून आल्याची माहिती मिळताच देगलूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
मयत 22 वर्षीय तरुणी नांदेड जिह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील असून तिचे नाव सावित्रा असल्याचे कळालेले असून ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत पुणे येथे काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री दोघेही दुचाकीवरून पुण्याहून आपल्या गावी परतत होते. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पहाटे तीन वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात मांजरसुंबा-केज या निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला अविनाशने गाडी थांबविली. अगोदर त्याने तरुणीवर ऑसिड टाकले. एवढय़ावरच तो थांबला नाही तर काही वेळाने तिच्या अंगावर पेट्रोल टापून तिला पेटवूनही दिले.
घटनेनंतर शनिवारी दुपारी या रस्त्यावरून जाणाऱया पादचाऱयांना तळमळण्याचा आवाज आल्याने त्यांनी खड्डय़ात पाहिले असता त्यांना अर्धवट जळालेली तरुणी दिसून आली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची मदत मिळवून तिला दवाखान्यात दाखल करेपर्यंत म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत तरुणी खड्डय़ात तडफडत होती.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या
ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे बीड व नांदेड जिह्यात खळबळ उडाली. तरुणीच्या मृत्यूनंतर आरोपीला अटक करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी करणे सुरु केले होते. दरम्यान देगलूर पोलिसांना आरोपी गावाकडे पळून जात असून तो सध्या आदमपूर फाटय़ाजवळील एका धाब्यावर थांबलेला असल्याची गोपनीय खबर मिळाली. त्यांनी तातडीने धाव घेऊन अविनाश राजूरे यास धाब्यावर मुसक्या आवळल्या. अटकेनंतर तपासात त्याने आपण तरुणीला जाळल्याची कबुली दिली.

























































