बीडमध्ये सामूहिक संसर्गाचा धोका वाढला; शहर आठ दिवसांसाठी लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड शहरातील अजीजपुरा , कारंजा भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण कोणाच्याही संपर्कात आले नसताना त्यांना कोरोनाची लागण झाली म्हणजेच सामूहिक संक्रमण झपाट्याने होत आहे. संक्रमणाची ही साखळी रोखण्यासाठी बीड शहर आठ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बुधवारी रात्री 12 वाजेपासून आठ दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात होणार असून 9 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.

बीड शहर कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात शहरात कोरोनाचे सापडलेले रुग्ण इतर कोणाच्याही संपर्कात आले नसताना त्यांनी संसर्ग झाला आहे. त्यावरून सामूहिक संक्रमण झपाट्याने फैलावत आहे. हा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम हाती घेतले. मात्र, संक्रमणाचा आकडा मर्यादित नसल्याने हे काम कठीण होत आहे. त्यामुळे रुग्णवाढीची साखळी तोडण्यासाठी तातडीने संपूर्ण शहर आठ दिवसासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतला आहे. त्यांनी याबाबतचे आदेशी जारी करून बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 9 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.