महाशिवरात्रीवर कोरोनाचे सावट, वैद्यनाथासह शिवालये राहणार बंद

parli-vaijnath-temple

कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून फैलाव रोखण्यासाठी परळी येथील प्रभू वैद्यनाथासह बीड जिल्ह्यातील सर्व शिवालये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी बंद राहणार आहेत, असा आदेश जारी करण्यात आला आहे.

परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर येत्या सोमवारपासून पुढील सात दिवस बंद राहणार आहे. वैद्यनाथासह बीड जिल्ह्यातील सर्व शिवालये बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोठी गर्दी होऊ शकते. या गर्दीमुळे कोरोना रुग्णात वाढ होऊ शकते, म्हणून प्रशासनाने शिवालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह कालच बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार महिनाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता.

108 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 108 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक 43 रूग्ण बीड तालुक्यात सापडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 19 हजार 224 रूग्ण पॉझिटिव्ह निघाले असून 18 हजार 238 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 587 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 94.87 एवढा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या