
छत्तीसगड राज्यातून बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ऊस तोडण्यासाठी आलेल्या १४ लोकांमधील आदिवासी समाजातील दोन ऊसतोड मजुरांच्या १३ व १४ वर्षीय अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गावातील किराणा दुकानदार गणेश राजाभाऊ घाटूळ व ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार यांनी शेतात नेऊन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.
बीड जिल्ह्यात यंदा ऊसतोड मजुरीसाठी परप्रांतीय मजुरांचा मोठा लोंढा आला आहे. छत्तीसगड राज्यातील १४ मजुरांची एक टोळी माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी आली होती. त्यातील दोघा मजुरांनी आपल्याला स्वयंपाक करून खाऊ घालण्यासाठी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना देखील सोबत आणले होते. तालुक्यातील रोशनपुरी येथे या ऊसतोड मजुरांचे ऊस तोडणीचे काम सुरू होते. हे मजूर दोन महिन्यापासून ऊसतोड मुकादम उद्धव श्रीकिशन तिडके यांनी आणले होते. दि.२४ डिसेंबर रोजी ऊसतोड मजूर तोडणीचे काम करण्यास शेतात गेले होते त्यावेळी त्यांच्या झोपडीमध्ये या अल्पवयीन मुली एकट्याच होत्या. याचा फायदा घेऊन गावातील किराणा दुकानदार गणेश राजाभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार या दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना झोपडीतून काढून बाजूच्या ऊसाच्या व कापसाच्या शेतात नेले व तेथे त्यांच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर दोन्ही मुली प्रचंड दहशतीत होत्या. शेवटी यातील एका मुलीने दि.२८ डिसेंबर रोजी आपल्या वडिलांना बलात्काराच्या घटनेची माहिती दिली. दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी दि.२९ रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून या घटनेतील दोन्ही नराधम आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.






























































