राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस बीड जिल्ह्यावर रुसला, जिल्ह्यात अद्यापही दुष्काळ सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बीड

एकीकडे संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्यांना महापूर येत आहेत. धरणे तुडूब भरून वाहत आहेत. सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती असताना बीड जिल्ह्यावर मात्र पाऊस रुसला आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही अद्याप पावसाचा पत्ता नाही. नदी, नाले कोरडेठाक तर धरणात पाण्याचा थेंब नाही. पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही टँकरवरच मदार असून 600 टँकर अजूनही दिमतीला आहेत. चारा छावण्या पुन्हा सुरू केल्या जात आहेत. खरीप हंगाम नेस्तनाबूत होत आहे. पाच लाख हेक्टर वरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत.

काही भागात पाऊस नकोसा झाला असताना बीड जिल्ह्यात मात्र सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. रोज ढगांची गर्दी होत आहे. सूर्यदर्शन होत नाही मात्र पाऊसही येत नाही. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भयभीत झालेल्या बीड जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा आहे. दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. या परिस्थितीचा फटका सर्वांना बसत असून बाजारपेठा ओस पडल्या आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. बी-बियाण्यांसाठी कर्ज आणि उसनवारी करून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे.