
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
मराठवाड्यातून धरणे पाईपलाईनने जोडून पाणी प्रश्न सोडविण्याच्या महत्वकांक्षी वॉटरग्रीड योजनेमधून बीड जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ मराठवाड्यातील संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांचाच समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक पाणी टंचाई बीड जिल्ह्यात आहे. दुष्काळी जिल्ह्यातील 11 तालुके पाणी टंचाईने त्रस्त असताना बीड जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला नाही. वॉटरग्रीडच्या माध्यमातून जायकवाडी, माजलगाव, लोअर दुधणा, येलदरी, विष्णुपूरी, मांजरा, मणार आणि सिध्देश्वर या प्रमुख प्रकल्पांसह काही मध्यम आणि लघु प्रकल्प यांना जोडण्याचे धोरण वॉटरग्रीड मध्ये होते. मात्र पहिल्या टप्प्यातून बीड जिल्ह्याला वगळण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील जनतेमध्ये आपल्याला फसवले गेल्याची भावना निर्माण झाली असून, बीडला वगळून तेथील जनतेच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून भीषण दुष्काळ आहे, असे असतानाही सरकारने बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्याला वॉटरग्रीड योजनेतून वगळले. या प्रकरणी आपण आवाज उठवणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.






























































