
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील खाजगी रुग्णालयास कोणतीही परवानगी किंवा परवाना नसताना आंतररुग्ण विभाग सुरू करून रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डॉ. गणेश ढवळे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सहा तासापेक्षा जास्त काळ ही कारवाई सुरू होती . झाडाझडती घेऊन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दीपक क्लिनिक मध्ये डॉ गणेश ढवळे हे परवाना नसताना रुग्ण तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करत असल्याची तक्रार जयदत्त नागरगोजे या व्यक्तीने जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने नायब तहसीलदार आणि पोलिसांच्या उपस्थितीत ढवळे यांच्या रुग्णालयावर दुपारी दोन वाजता छापा घातला .त्यावेळी तेथे तापेच्या तीन रुग्णांवर अंतररुग्ण विभागात उपचार सुरू असल्याचे आढळून आले .
या ठिकाणी परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात औषधांचा अवैध साठा आढळून आला. तसेच रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे दिसून आले. जिल्हा आरोग्य विभाग यांचे नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले नाही. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ ढवळे यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत नेकनूर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते .
जिल्हा शल्य चिकित्सक असो की आरोग्य अधिकारी अथवा शासकीय काम याबाबत नियमावर बोट ठेवणाऱ्या डॉ. ढवळे यांना रुग्णालय सुरू ठेवण्यासाठीचे नियम माहीत नव्हते का, माहीत होते तर त्यांनी त्याची पूर्तता न करता रुग्णांवर उपचार करून नियमभंग का केला,कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्ती मध्ये रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक असताना त्यांनी हा नियम का डावलला हे प्रश्न अनुत्तरित आहेत .































































