Beed News – झोका खेळताना गळफास बसला, नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; माजलगावातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसल्याने एका नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात घडली. वृंदा समीर रुद्रवार असे या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील व्यापारी प्रदीप रुद्रवार यांचे खंडोबा मैदान परिसरात घर आहे. मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने त्यांची 9 वर्षांची नात वृंदा ही आपल्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या झोक्यावर लहान बहिणीसह खेळत होती. खुर्चीवर चढून झोका हातात घेत असताना खुर्ची खाली कलंडली आणि वृंदाला झोक्याचा गळफास बसला. यात वृंदाचा जागीच मृत्यू झाला.

मुलगी जेवायला खाली का आली नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर आली असता तिला मुलीला गळफास बसल्याचे दिसले. मुलीला पाहून आईने हंबरडा फोडला. आईचा आवाज ऐकून आजी, आजोबा, वडील धावत आले. त्यांनी तात्काळ वृंदाला हॉस्पिटलला नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वृंदा ईगलवुड शाळेत दुसरी वर्गात शिकत होती. तिच्या आकस्मित मृत्यूने रुद्रवार परिवारावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.