बीड जिल्ह्यातील महिलांना गर्भाशयच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

दुष्काळाची दाहकता वाढली आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांना ऊसतोडणी साठी गाव सोडावे लागत आहे, गर्भाशय काढलेली महिला मासिक पाळीच्या गर्तेत अडकत नाही. म्हणून ऊस तोडणी साठी जायचं असेल तर गर्भाशयाची पिशवी काढणे चांगलेच. यातून हजारो महिलांचे गर्भाशय काढले गेल्याची बातमी द हिंदू या इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले त्यांनी बीड जिल्ह्यातील या घटनेचा अहवाल राज्यसरकार कडे मागवला आहे, आज चौकशी साठी चार डॉक्टरांची टीम तयार केली गेली आहे अहवाल आरोग्य विभागाकडे पाठवला जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकात बीड जिल्ह्यातील हे धक्कादायक वृत्त प्रकाशित झाले, बीड जिल्ह्यातील महिलांना गर्भाशयच नाही असे ते वृत्त होते , बीड जिल्ह्यात गर्भाशय काढण्याचा बाजार मांडला गेलाय , गर्भाशयाचा कोणताही आजार असो तात्काळ पिशवी काढण्याचा सल्ला खाजगी रुग्णालयात दिला जातो त्यातच दरवर्षी बीड जिल्ह्यातून दोन लाख महिला ऊस तोडणीसाठी हातात कोयता घेऊन राज्यभरातील कारखान्यावर जातात , ऊस तोडणीसाठी जात असताना दोन ,तीन मुले झाले की गर्भाशय काढले जाते. त्यामुळे मासिक पाळीची समस्याच राहत नाही आणि महिलांचा वेळ वाया जात नाही. या कारणाने गर्भाशयाची पिशवी काढण्यावर भर असतो , द हिंदू या इंग्रजी दैनिकात अशी एक बातमी प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली , केंद्र सरकारही हादरले, या धक्कादायक घटनेचा अहवाल तातडीने पाठवून देण्याचे आदेश राज्यसरकारला देण्यात आले, आरोग्य सचिवांच्या आदेशानुसार बीड जिल्हा आरोग्य खाते कामाला लागले, तातडीने जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी चार डॉक्टरांची एक समिती नेमली आहे. चौकशी करून अहवाल आरोग्य सचिवांकडे पाठवला जाणार आहे,

दै सामना ने लक्ष वेधले होते

बीड जिल्ह्यात महिलांना गर्भाशयाच्या आजाराची भीती दाखवून गर्भाशय काढले जातात दरवर्षी हजारो महिलेच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया उघडपणे केल्या जातात, खाजगी रुग्णालये अज्ञानपणाचा फायदा घेऊन गर्भाशय शस्त्रक्रिया मध्ये नफा कमवत आहे त्यांच्या या दुकानदारीमुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे , गर्भाशयाची पिशवी नसल्यामुळे महिला विकलांग होते अशा प्रकारचे वृत्त 6 जून 2012 च्या अंकात दै सामना ने प्रकाशित केले होते त्याच वेळी आरोग्य खात्याने गांभिर्याने घेतले असते तर या आठ वर्षात लाखो महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या गेल्या नसत्या. या महिला विकलांग झाल्या नसत्या मात्र प्रशासनाला आता जाग आली ते ही केंद्र सरकार खडबडून जागे झाल्यानंतर.

हो समिती नेमली आहे- डॉ थोरात

आरोग्य सचिवांच्या आदेशानुसार डॉ इंद्रजित शिंदे यांच्या नेत्रत्वाखाली चार डॉक्टर समिती मध्ये आहेत ही समिती संबंधित गावामध्ये जाऊन चौकशी करेल, ज्या महिलांच्या गर्भाशय काढण्यात आले त्यांची वय, त्यांचा आजार, याचा अभ्यास करेल गरज नसताना पिशवी काढली गेली का ? कोणी काढली त्या डॉक्टरांची चौकशी करून संबंधित डॉक्टरवर कारवाई केली जाईल, गरज भासल्यास त्या रुग्णालयाला सील केले जाईल असे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सामनाशी बोलताना सांगितले.