
रमजान महिन्यात अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. सर्व धर्मीयांमध्ये सलोखा टिकून राहावा यासाठी प्रत्येक जाती धर्माचे लोक इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होतात. मात्र बांगलादेश मधील सिलहट येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत हिंदूंना गोमांस खायला देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या वतीने सिलहट येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही पत्रकार देखील उपस्थित होते. यापैकी अनेकजण हिंदू होते. यावेळी इफ्तारसाठी वाढण्यात आलेल्या ताटात सर्वांना खाण्यासाठी गोमांस देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी इफ्तार मेनूमध्ये गोमांसाशिवाय इतर कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. यामुळे इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेले हिंदू कार्यकर्ते व पत्रकार काहीही न खाताच इफ्तार पार्टीमधून निघून गेले.
मात्र यानंतर बीएनपीच्या हिंदू कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित पत्रकारांनी झालेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. तसेच आयोजकांचा आणि निमंत्रण देणाऱ्यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी आम्ही हिंदू असून देखील आमच्या ताटात गोमांस वाढल्याचा आरोप केला. बीएनपीचे स्थानिक कार्यकर्ते मंटू नाथ यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “इफ्तार पार्टीत गोमांसाशिवाय खाण्यासाठी इतर कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने माझ्यासह इतर 20 हिंदू सहकाऱ्यांना उपाशी राहावे लागले. आम्ही केवळ सर्व मुस्लिम नेते आणि कार्यकर्त्यांना उपवास सोडताना पाहत होतो”
बीएनपीच्या विद्यार्थी संघटनेचे स्थानिक नेते कनक कांती दास म्हणाले की, “तुम्ही तुमच्या इफ्तारचा आनंद लुटला आणि आम्ही हिंदू निमंत्रित फक्त पाहतच राहिलो”. याबद्दल कोणी माफी देखील मागितली नाही.
स्तंभलेखक आणि एकशी पदक विजेते अजय दास गुप्ता म्हणाले की, बांगलादेशवर 15 वर्षे कब्जा करणाऱ्या आणि राज्य करणाऱ्या लष्करी शासकांनी पाकिस्तान समर्थक जमात-ए-इस्लामीला कायदेशीर मान्यता दिली. देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यव्यवस्थेला कमकुवत करणाऱ्या घटनात्मक दुरुस्त्याही त्यांनी सादर केल्या आणि अखेरीस इस्लामला बांगलादेशचा राज्य धर्म घोषित केला. पुढे ते म्हणाले की बीएनपी आणि त्यांचा मित्र जमात-ए-इस्लामी सारख्या काही पक्षांनी “कट्टरपंथी इस्लामचे पाकिस्तानी लष्करी-रॅडिकल मॉडेल” पुन्हा येथे राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात ते अयशस्वी ठरले.




























































