
रत्नागिरीत गोमांस तस्करी करणाऱ्य़ा टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून तब्बल अडीच हजार किलो मांस जप्त करण्यात आले असून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
दापोली सिमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या गस्ती पथकाने काल रात्री 12.30 वाजणेचे सुमारास मंडणगड तालुक्यातील कुंबळे लाटवण मार्गावरील वलौते जवळ मुंबईकडे जाणारे वाहन संशयावरून अडवून तपासणी केली असता त्यात सुमारे 2 हजार 500 किलो गोवंशाचे तसेच अन्य प्राण्याचे मांस आढळून आले असून या प्रकरणी वाहनचालकासह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मुद्देमाल व दोन संशयितांना मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सिमाशुल्क विभागाचे अधीक्षक जे.एम.भोईटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सीमाशुल्क विभागाची अधीक्षक जे.एम भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली सिमाशुल्क विभागाकडून दररोज स्मगलींग विरोधात गस्त घातली जाते. सोमवारी रात्री 12.30 वाजता विभागाचे गस्ती पथक मंडणगड तालुक्यातील कुंबळे ते लाटवण या भागात पथकाला महींद्रा वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले या वाहनातून दुर्गंधी येत होती तसेच रक्तही रस्त्यावर पडत असल्याने पथकाने ते थांबवले. या वाहनात काय आहे याची चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकाने या वाहनाची तपासणी केली. तेव्हा या वाहनातून पाणी व रक्त बाहेर पडत असल्याचे आढळले.
वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वाहनात गोवंशाचे व अन्य प्राण्याचे मांस असल्याचे सांगितले. पथकाने या वाहनाचा चालक व अन्य एका संशयिताला वाहनासह ताब्यात घेऊन दापोली येथे आणले. या वाहनाची तपासणी केली असता सुमारे 2 हजार 500 किलो मांस आढळून आले असून या वाहनात 2 कुर्हाीडी, 4 चाकू, धार लावण्यासाठी 3 कानशी तसेच धार लावण्यासाठी दोन दगड आढळले. सर्व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
सदर गाडीम्ध्ये 10 ते 12 गोवंशांची तसेच इतर 2 ते 3 प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस मुंबईत घेऊन जात होते अशी माहिती आरोपी सईफ अस्लम कुरेशी आणि इरफान अमीनुद्दीन कुरेशी यांनी दिली. सदर मांस हे कुंबळे, वलौते परिसरातील मुनाफ या व्यक्तीकडून घेतले असून ते इम्रान या कुर्ला येथील राहण्याऱ्य़ा व्यक्तीकडे पोच करावयाचे असल्याचेही या आरोपींनी सांगितले. सदर मांस व वाहन संशयितांसह मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती अधीक्षक भोईटे यांनी दिली.


























































