बोरिवलीचा भुयारी मार्ग झाला भिकाऱ्याचा फ्लॅट; पादचारी, रहिवासी हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑलाईन । मुंबई

बोरिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा दत्तपाडा भुयारी मार्ग जणू काही एका भिकाऱ्याने स्वतःच्याच नावावर केला आहे. ही जागा म्हणजे त्याचा फ्लॅट असल्याच्या अविर्भावात हा भिकारी या ठिकाणी झोपतो, राहातो, जेवतो. हा भिखारी अंध असल्याने त्याला येणारे-जाणारे पैसे देतात. पण तो हे पैसे दारूत उडवत असून त्याचा येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे चांगले रस्ते, पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारला हेच का अच्छे दिन, असा सवाल बोरिवलीकर विचारताना दिसत आहेत.

भिकाऱ्याने हा मार्ग जणूकाही आपल्याच सातबाऱ्यावर केल्याचे चित्र असून त्याच्यासमोर पालिका प्रशासनही हतबल झाले आहे. या भिकाऱ्याने भुयारी मार्गात टाकलेल्या अन्न पदार्थांमुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. हा भिकारी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे देण्याची विनवणी करतो. भुकेला असल्याचे दाखवतो. त्यामुळे माणुसकीपोटी अनेक जण त्याला पैसे देतातही. परंतु हा भिकारी काठी टेकत एका वाईन शॉपमध्ये घुसतो आणि तिथे दारू पिऊन पुन्हा कुणाच्या तरी खांद्याचा आधार घेत भुयारी मार्गात येऊन बसतो, अशी चर्चा आहे.

 बेगर्स होममध्ये जागा नाही, काय करणार!

या भिकाऱ्याची गोधडी, चादर, चपला येथे पडलेल्या असतात. येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक प्रयत्न करून पाहिले, परंतु ‘बेगर्स होममध्ये जागा नाही. आम्ही काय करणार,’ अशी उत्तरे पालिका प्रशासन देत असून शिक्षण मंत्री आणि पालक मंत्री असलेल्या भागात एका भिकाऱ्याने अशा प्रकारे रहिवाशांना आणि दुकानदारांना, पादचारांना, नागरिकांना हैराण केल्याने त्यांच्यात प्रशासनाविरोधात प्रचंड संताप आहे.