
पिरनवाडी जिल्हा बेळगांव येथील चौकात आज “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असा भव्य फलक उभा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
पिरनवाडी येथील चौकात ग्रामस्थांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा चौक वर्षानुवर्षे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जातो. पण काही कानडी संघटनांनी गेल्या आठवड्यात या चौकात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा अचानक रातोरात बसवून, मराठी विरुद्ध कानडी असा वाद निर्माण केला. मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याने, अगोदरच तणाव निर्माण झाला असताना, पिरनवाडीतील या प्रकाराने सीमाभागात वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे यांना बेळगावला पाठवले होते. त्यांनी घेतलेल्या दोन्ही गटांच्या बैठकीत क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा सध्या आहे, त्याच ठिकाणी बसवायचा आणि चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्यायचे असा तोडगा काढला होता. त्यानुसार आज पिरनवाडीत सकाळी शिवप्रेमींनी एकत्र येऊन, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवरायांच्या जयघोषात या चौकात भव्य असा “छत्रपती शिवाजी महाराज चौक” नामफलकाचे अनावरण केले. यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.
मनगुत्ती गावात शिवरायांचा पुतळा कधी बसविणार ?
दरम्यान पिरनवाडीपूर्वी मनगुत्ती येथे ग्राम पंचायतीने ठरावाद्वारे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात कानडी पोलिसांनी काढला. सीमाभागासह महाराष्ट्रातही त्याचे संतप्त पडसाद उमटले. त्यामुळे जनक्षोभासमोर झुकलेल्या कर्नाटक प्रशासनाने पंधरा दिवसांत सन्मानाने हा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी थेट मनगुत्तीत लाँगमार्च काढून, पुन्हा एकदा कानडी प्रशासनाला यासंदर्भात निर्णय घेण्यास भाग पाडले होते. आता मनगुत्तीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुन्हा सन्मानाने कधी विराजमान होणार याकडे सर्व शिवप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.































































