स्टोक्सने त्या चार धावा नाकारल्या होत्या, जेम्स ऍण्डरसनचा खुलासा

111

सामना प्रतिनिधी ।  लंडन

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या थ्रोवर बेन स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून सीमापार झाल्याने इंग्लंडला 4 अवांतर धावा मिळाल्या. मैदानी पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला 6 दिल्या, मात्र स्वतः स्टोक्सने त्या अवांतर 4 धावा नाकारत पंचांना निर्णय बदलण्याची विनंती केली होती, असा खुलासा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसनने बुधवारी केला.

मायकल वॉनशी ‘बीबीसी बेलएंडर्स पोडकास्ट’वर चर्चा करताना जेम्स ऍण्डरसन म्हणाला, क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकल्यानंतर तो फलंदाजाला लागून दूर गेल्यास धाव घेतली जात नाही असा अलिखित नियम आहे, मात्र स्टोक्सच्या बॅटला चेंडू लागून थेट सीमापार झाल्याने इंग्लंडला नियमानुसार 4 अतिरिक्त धावा मिळाल्या, मात्र बेन स्टोक्सने पंचांकडे जाऊन त्या 4 अवांतर धावा कमी करण्यास सांगितले होते. आम्हाला त्याची गरज नाही असे तो बाणेदारपणे म्हणाला होता. मात्र पंचांनी आपला निर्णय कायम ठेवला. खरं तर या अवांतर चार धावांमुळे इंग्लंडने लढतीत पुनरागमन करता आले. नाहीतर जगज्जेतेपदाची माळ न्यूझीलंडच्या गळ्यात पडली असती. त्या अवांतर धावांवरून नंतर बरेच रामायण झाले. अनेक आजी-माजी खेळाडूंनी पंचांचा निर्णय चूकल्याचे आगपाखड केली. माजी पंच सायमन टॉफेल यांनीही या चेंडूवर सहाऐवजी पाचच धावा द्यायला हव्या होत्या, असे सांगत पंच कुमार धर्मसेना यांची चूक झाल्याचे म्हटले होते.

बेन स्टोक्सला मिळणार ‘सर’ उपाधी

इंग्लंडच्या जगज्जेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सला सर (नाइटहुड) या उपाधीने गौरविण्यात येण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या किताबी लढतीत त्याने नाबाद 84 धावांची खेळी करीत सामना टाय करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही त्याने बहुमोल धावा केल्या. भावी पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले इंग्लंडचे दोन उमेदवार बोरिस जॉन्सन व जेरेमी हंट दोघेही बेन स्टोक्सच्या कामगिरीवर भलते फिदा आहेत. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर स्टोक्सला ‘सर’ या उपाधीने गौरविण्यात येणार हे जवळपास निश्चित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या