पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते सब्यसाची घोष (Sabyasachi Ghosh) यांना सेक्स रॅकेटप्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांनी घोष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली असून 6 महिलांची सुटका केली आहे. या प्रकारानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
तृणमूल काँग्रेसने सब्यसाची घोषण यांच्यावर सेक्स रॅकेट चालविल्याचा आरोप केला आहे. याबाबत टीएमसीने एक पोस्ट आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केली आहे. “बंगालचे भाजप नेते सब्यसाची घोष हे हावडातील संकरेलमध्ये आपल्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविताना पकडले गेले. पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली असून 6 पीडित महिलांना वाचवले आहे. यातील अनेक मुली अल्पवयीन आहेत. हाच खरा भारतीय जनता पक्ष असून ते मुलींचे नाही तर दलालांचे रक्षण करतात”, असा घणाघात टीएमसीने चढवला आहे.
खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संकरेल भागातील धुलागडमध्ये राष्ट्रीय महामार्ग 116 जवळ असणाऱ्या एका हॉटेलवर छापा मारला. पोलिसांनी 11 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये हॉटेल मालक आणि भाजप नेते सब्यसाची घोष यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे तृणमूलचे नेते शेख शाहजहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप होत असताना आता भाजपचा नेताही सेक्स रॅकेटप्रकरणी अटक झाल्याने बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण टोकाला पोहोचले आहे.
सब्यसाची घोष यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविले होते. पोलिसांनी छापेमारीदरम्यान दोन अल्पवयीन मुलींसह सहा महिलांना वाचवले आणि घोष यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांविरोधात मानस तस्करी कायदा आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना गुरुवारी हावडातील पॉस्को कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने सब्यसाची घोषण यांच्यासह इतर आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.