पश्चिम बंगालमध्ये भाजपची मते 23 टक्क्यांनी घटली

bjp-logo

पश्चिम बंगालच्या करीमनगर, कालियागंज आणि खडगपूर या तीन मतदारसंघांतील विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपाचा जबरदस्त पराभव झाला. तिन्ही जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. हा भाजपासाठी मोठा झटका मानला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही जागांवर भाजपाला 50 टक्क्यांहून जास्त मते पडली होती परंतु विधानसभा पोटनिवडणुकीत हीच मते तब्बल 23 टक्क्यांनी घटली आहेत. तिन्ही जागांवरील पराभवामुळे अवघ्या सहा महिन्यांत भाजपाची लोकप्रियता घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे.

2016 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला करीमनगर, कालियागंज आणि खडगपूर या तीन विधानसभा मतदारसंघांत केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. एक जागा भाजपा तर एक जागा काँग्रेसने खेचून आणली होती, मात्र विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने डाव्या पक्षांची मतेही खेचली होती, परंतु विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाचा जबरदस्त पराभव केला.

कुठे किती टक्के मते घटली
निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार विधानसभा पोटनिवडणुकीत खडगपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची मते लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी घटली तर करीमपूरच्या जागेवर भाजपाच्या मतांमध्ये किंचितशी वाढ पाहायला मिळाली. कालियागंजच्या जागेवर भाजपाची मते 9 टक्क्यांनी घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

एनआरसीचा मुद्दा भारी पडला
भाजपाने एनआरसीचा मुद्दा उचलून धरला, परंतु याच मुद्दय़ाचा फटका भाजपाला विधानसभा पोटनिवडणुकीत बसल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहेत. करीमपूर आणि कालियागंज या जागा नादिया आणि उत्तर दिनाजपूर या जिह्यांत येतात. हे दोन्ही जिल्हे बांगलादेशच्या सीमेवर आहेत. त्यामुळे एनआरसीचा मुद्दा या दोन्ही जिह्यांसाठी अत्यंत संवेदनशील आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यात एनआरसी लागू करू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या