ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढणार; 291 उमेदवारांची यादी जारी, 28 आमदारांचे तिकीट कापले

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने उमेदवारांची यादी जारी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यंदा नंदीग्राम मधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी एकूण 291 उमेदवारांची यादी जारी केली आहे. तर दार्जिलिंगच्या तीन जागा मित्रपक्षाला देण्यात येणार आहे.

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी यादी जारी केली आहे. सोबतच पंश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा विजय होणार असं म्हटलं आहे. या निवडणुकीत ‘खेला होबे, देखा होबे, जीता होबे’ ( खेळू, लढू आणि जिंकू ) सोबत पुढे जाऊ असा संदेश देताना ममता यांनी आरोप केला की, भाजप पैशांचा वापर करत आहे, गाड्यांमधून पैसा आणला जात आहे.

ममता बॅनर्जी जिथून आधी निवडणूक लढल्या त्या भवानीपुर येथून सोवानदेब चॅटर्जी यांना संधी देण्यात आली आहे. ममता यांनी घोषणा केली आहे की 80 वर्षाहून जास्त वय असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात येणार नाही.

बांकुरा येथून फिल्मस्टार सायानतिका, उत्तरपाडाहून कंचन मलिक, शिबपुर येथून क्रिकेटर मनोज तिवारी यांना तिकीट देण्यात आलं आहे. गायिका अदिति मुंशी यांना राजरहाट, चंद्रिमा भट्टाचार्य यांना उत्तर दमदम मधून तिकीट देण्यात आले आहे.

ज्येष्ठ तृणमूल नेते मदन मित्रा यांना कमरहाटी, मंत्री शशि पांजा यांना श्यामपुकुर येथून तिकीट देण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये माहिती दिली की, जवळपास 27-28 आमदारांना यंदा तिकीट देण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या