
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी दुपारी झालेल्या आयपीएल लढतीत राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. लेगस्पिनर युजवेंद्र चहल याची प्रभावी गोलंदाजी आणि सलामीवीर देवदत्त पडीक्कल व कर्णधार विराट कोहली याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या मोसमातल्या तिसऱया विजयाला गवसणी घातली. राजस्थान रॉयल्सला दुसऱया पराभवाला सामोरे जावे लागले.
राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या 155 धावांचा पाठलाग करणाऱया रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 गडी राखून विजयी लक्ष्य ओलांडले. अॅरोन फिंच अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडीक्कल व विराट कोहली याने 99 धावांची दमदार भागीदारी करीत संघाचा विजय निश्चित केला. देवदत्त पडीक्कलने एक षटकार व सहा चौकारांसह 63 धावांची खेळी केली. या स्पर्धेत हा युवा खेळाडू शानदार खेळ करीत आहे. विराट कोहलीने दोन षटकार व सात चौकारांसह नाबाद 72 धावा चोपून काढल्या. या खेळीने विराट कोहलीला सूर गवसला.
दरम्यान, याआधी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवले. महिपाल लोमरोर याने सर्वाधिक 47 धावा केल्या. राहुल तेवतीयाने नाबाद 24 धावांची तर जोफ्रा आर्चरने नाबाद 16 धावांची खेळी साकारली. युजवेंद्र चहल याने 24 धावा देत 3 फलंदाज बाद केले. यावेळी त्याने स्वतःच्या गोलंदाजीवर टिपलेला झेल विवादास्पद ठरला, पण तिसऱया पंचांकडून संजू सॅमसनला बाद देण्यात आले.




























































