कुमारस्वामींना पुलवामा हल्ल्याबद्दल 2 वर्षांपूर्वीच माहीत होते ?

61
hd-kumarswamy

सामना ऑनलाईन। बंगळुरू

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल आपल्याला 2 वर्षांपूर्वीच माहिती होते, असे विधान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या कथित विधानावरून भाजपने कुमारस्वामी यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. जर कुमारस्वामी यांना हल्ल्याबद्दल माहिती होती तर त्यांनी ती पोलिसांना किंवा राष्ट्रपतींना का दिली नाही असा प्रश्न माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी विचारला आहे. जर कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली असती तर 40 जवानांचे प्राण वाचले असते, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.

जम्मू-कश्मीर येथील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर देशभरात या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले होते. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या, अशी मागणी देशातील जनतेने केली होती. कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात एका सभेमध्ये कुमारस्वामी यांनी आपल्याला एका माजी लष्करी अधिकाऱ्याने 2 वर्षांपूर्वींच असा हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती, असे विधान केले होते. त्यावरून सगळीकडे खळबळ उडाली होती. कुमारस्वामी यांच्या याच वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्नही केला होता. कुमारस्वामी यांनी देशहित लक्षात न ठेवता देशाच्या सुरक्षिततेचा अपमान केला. यामुळे त्यांच्यावर कायेदशीर कारवाई करावी अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते जगदीश शेट्टार यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या