गिरगावात रस्ता खचून बेस्ट बस अडकली, भुयारी मेट्रोच्या बांधकामामुळे रहिवासी इमारतींना धोका

सिप्झ ते कुलाबा भुयारी मेट्रो मार्गावरील गिरगाव स्थानकाजवळ रस्ता खचून बेस्ट बस जवळपास पाच फूट खाली रुतल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये 40 प्रवासी होते. रुतलेली बस एका जनरेटरमुळे शेजारच्या 15 फूट खोल खड्ड्यात पडण्यापासून वाचली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भुयारी मेट्रोच्या बांधकामामुळे रस्ता खचण्याबरोबरच आसपासच्या रहिवासी इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मेट्रो प्रशासन आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बेस्टची 35 क्रमांकाची बस बॅकबे आगारातून जे. मेहता मार्गाकडे जात होती. ही बस मेट्रोच्या गिरगाव स्थानकाजवळ आली असता डॉ. बाबासाहेब जयकर मार्गावर ठाकूरद्वार जंक्शन येथे मेट्रोचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता खचला. त्यात बस पाच फूट खोल रुतली. मुसळधार पावसात रस्ता आणखी खचत चालल्याने बेस्ट बसमध्ये अडकलेल्या 40 प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिस व बेस्टच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरातील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गावरील बेस्ट बसेस तसेच इतर गाड्यांची वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळवण्यात आली. भुयारी मेट्रोच्या बांधकामात निष्काळजीपणा केला जात असल्याने शहरात ठिकठिकाणी अपघातांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासन आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्य सरकारविरोधात मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तब्बल 15 फुटांपर्यंत रस्त्याला गेले तडे

रुतलेली बस काही तासानंतर बाहेर काढण्यात आली. मेट्रोच्या कामाभोवती उभारलेले संरक्षक पत्रे व इतर बांधकाम साहित्यदेखील खचलेल्या रस्त्याबरोबर जमिनीत रुतले होते. ते बाहेर काढण्याचे काम दुपारी जेसीबीच्या साहाय्याने हाती घेण्यात आले. यावेळी ठाकूरद्वार जंक्शनवरील डॉ. बाबासाहेब जयकर मार्गाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोठे तडे गेले. त्यामुळे येथील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शिवसेना आक्रमक

भुयारी मेट्रोच्या नियोजनशून्य बांधकामामुळे बेस्ट बस खचल्यानंतर शिवसैनिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, शाखाप्रमुख निलेश अहिरकर, माजी नगरसेवक संपत ठाकूर, माजी नगरसेविका युगंधरा साळेकर, विशाखा पेडणेकर, बळीराम परब यांच्यासह स्थानिक, शिवसैनिक उपस्थित होते.