
मुंबईत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यातच बेस्टच्या 66 कर्मचाऱयांना कोरोना झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे बेस्टने आता लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच बेस्टने प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनिव्हर्सल पासची तपासणी करूनच कंडक्टर आता तिकीट देणार आहेत.
लोकलमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच तिकीट किंवा पास दिला जात आहे. बेस्टमध्ये मात्र असे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश असूनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला लस घेणे गरजेचे असल्याचे बिंबवण्यासाठी बेस्टच्या प्रवाशांनाही आता युनिव्हर्सल पास दाखवा आणि निर्धास्तपणे प्रवास करा, असे आवाहन बेस्टने केले आहे. बेस्टच्या वडाळा आगारासह अन्यत्र गुरुवारी युनिव्हर्सल पासची तपासणी करूनच प्रवाशांना तिकीट देण्यात आले. बेस्टची रोजची प्रवासी संख्या 27 लाखांच्या आसपास गेली आहे. त्यामुळे बेस्टने लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच बेस्टमध्ये प्रवेश देण्याचे ठरवले आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
























































