
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेणाऱ्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे 7 जानेवारी मध्यरात्रीपासून कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी दुपारी 3 वाजता कृती समिती आणि पालिका प्रशासन यांच्यात अंतिम बैठक होणार आहे. या वेळी मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही तर मध्यरात्रीपासून ‘बेस्ट’ ठप्प होणार आहे.
‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बेस्टच्या कामगार संघटनांनी चर्चा केली. मात्र मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे कृती समितीने संप पुकारला आहे. दरम्यान, बेमुदत संपाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने चर्चेसाठी बोलावले आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता ही बैठक होईल. मात्र प्रशासन कामगारांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचे याआधी अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. ही बैठक केवळ दिखाऊपणासाठी बोलावली असल्याचा आरोप करीत संप अटळ असल्याचे ‘बेस्ट’ कृती समितीचे शशांक राव यांनी सांगितले.
कामगार सेना कामगारांच्या पाठीशी
कामगार सेना कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. कामगारांच्या मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात. त्यामुळे संप झाल्यास कामगार सेनेशी संलग्न असलेले हजारो कामगारही गैरहजर राहून संपाला पाठिंबा देतील, असे ते म्हणाले. संपाबाबत वडाळा बस डेपोत सोमवारी दुपारी 2.30 वाजता कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्मचाऱयांच्या मागण्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही केलीच पाहिजे. संप झाल्यास मुंबईकरांना मोठय़ा गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. हे टाळण्यासाठी प्रशासन आणि कृती समितीने हा विषय सामंजस्याने हाताळून मार्ग काढला पाहिजे.
-आशीष चेंबूरकर, अध्यक्ष, ‘बेस्ट’ समिती




























































