
बेस्टने किमान भाडे पाच रुपये केल्यापासून बेस्टकडे सुटय़ा नाण्यांचा अक्षरशः खच पडला असून आता बेस्टने सर्वसामान्य नागरिकांना उच्च मूल्यांच्या नोटांच्या बदल्यात ही सुटी नाणी देण्यासाठी आगारांमध्ये व्यवस्था केली आहे.
बेस्ट उपक्रमाकडे सध्या रु. 10 व रु. 20 मूल्यवर्गाच्या नोटा आणि रु.10, रुपये 5, 2 व 1 या मूल्याच्या नाण्यांचा मुबलक साठा तयार झाला आहे. ही सुटी नाणी नागरिकांना, व्यापारी वर्गाला आणि समाजातील इतर तत्सम घटकांना उच्च मूल्यवर्गाच्या बदल्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याकरिता उपक्रमाच्या सर्व बस आगारांमध्ये तिकीट व रोख विभागात रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून स. 9.30 ते सायं. 4 या वेळेत सुटी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था केली आहे.

































































