
बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या हितासाठी आता शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन लढा देणार आहे. बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार, 18 ऑगस्ट रोजी होणार असून या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे युतीची घोषणा करण्यात आली आहे.
बेस्ट पतपेढी निवडणूक एकत्र लढवण्याबाबत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याप्रमाणे आता पतपेढी निवडणुकीसह बेस्ट उपक्रमातील प्रत्येक लढाई बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे, असे सांगण्यात आले.
n महायुती सरकारच्या काळात बेस्ट उपक्रम काही उद्योगपतींच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. परिणामी, बेस्ट उपक्रमातील मराठी कामगारांचा टक्का घटत चालला आहे. आता पतपेढी निवडणुकीच्या माध्यमातून बेस्टमध्ये शिवसेना-मनसे एकत्र आल्याने उपक्रमातील कामगार वर्गाचे विविध प्रश्न सुटण्याची आशा पल्लवित झाली आहे.
प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेस्ट पतपेढीमध्ये सध्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षांत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने कामगारांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी कामे केली आहेत. त्यामुळे पतपेढी निवडणुकीच्या प्रचाराला बेस्ट कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता शिवसेनेसोबत मनसे आल्यामुळे ताकद आणखीन वाढली आहे. याचे सकारात्मक चित्र बेस्ट पतपेढी निवडणुकीत दिसणार आहे.