ऑगस्टच्या पगारात रु.1500 ची चिल्लर,  सुटय़ा पैशांचा निपटारा करण्यासाठी ‘बेस्ट’चा उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टमध्ये सुटय़ा नाण्यांचा भरणा चालूच असल्याने आता पुन्हा ऑगस्ट 2020चा पगार देताना ज्यांचे वेतन 13,500 रुपयांपेक्षा जास्त त्यांना 13,500 रोख स्करूपात देण्यात येणार असून त्यापैकी 1500 रूपये नाण्यांच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत.

बेस्टचे तिकीट किमान पाच रूपये करण्यात आल्यानंतर बेस्टमध्ये सुटे पैसे जमण्याचा त्रास होऊ लागला. ही सुटी नाणी काय करायची याचा उलगडा होईना म्हणून काही बँकांना ही नाणी देण्यात आली. परंतू आता बँकांनी देखील हात वर केल्याने बेस्टच्या कर्मचाऱयांचा पगार सुटय़ा पैशांत करण्याचा प्रकार सुरू झाला. बेस्टच्या कामगारांना ऑगस्टच्या पगारापैकी 13,500 रुपयांचे वेतन हे त्यामुळे रोख स्वरूपात देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. ज्यांचे वेतन 13,500 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांनाच 13,500 रोखीच्या स्वरूपात देण्यात येणार असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या सर्व विभागातील अधिकारी आणि सेवकवर्ग सदस्यांना म्हणजेच सामान्य प्रशासन, विद्युत पुरवठा व वाहतूक विभागातील सर्व अधिकारी व सेवकवर्ग यांना रोख स्वरूपात 13,500 रूपये एवढी रक्कम देण्यात येईल, त्यात 12000 रूपये छोट्या मुल्यांच्या नोटांमध्ये तर 1500 रूपये नाण्याच्या स्वरूपात देण्यात येतील असे प्रशासनाने म्हटले आहे. रू.1500 ही रक्कम प्लॅस्टीकच्या पिशव्यांमधून तिकीट व रोख विभागातून घेताना कामगाराने जागेवरच नीट मोजून घ्यावी व तफावत असल्यास लागलीच निदर्शनास निदर्शनास आणावी असे स्पष्ट केले आहे. 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत या रक्कमेचे वाटप शनि., रवि., सार्वजनिक सुट्टी वगळुन सकाळी 9.30 ते दु.1 आणि दु.1.30 ते 4.30 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.