बेस्ट कामगारांचा पगार धनादेशाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील (पीएमसी) रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाने हजारो खातेधारकांचे धाबे दणाणले असताना आता बेस्ट उपक्रमातील काही कर्मचाऱयांची सॅलरी अकाऊंट या बँकेत असल्याने त्यांची अडचण होऊ नये म्हणून बेस्ट कामगारांना या महिन्याचा पगार धनादेशाने देण्याची सोय बेस्ट प्रशासनाने केली आहे. तसेच ज्या कामगारांची खाती या बँकेत आहेत त्यांना दुसऱया बँकेत खाते काढण्यासाठी किंवा दुसऱया बँकेच्या खात्याचा तपशील बेस्टला देण्यासाठी महिनाभराचा कालावधीही देण्यात येणार आहे.

पीएमसी बँकेत खाते असलेल्या कामगारांना पुढील पगार दुसऱया बँक खाते वा धनादेशाच्या रूपाने देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. पीएमसी बँकेतील खातेधारकांमध्ये बेस्टमधील कामगारांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार साधारण 500पर्यंत तरी बेस्ट कामगारांची खाती पीएमसीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये आहेत.

’उपक्रमाची पर्यायी व्यवस्था
बेस्टकडून कामगारांची अडचण लक्षात घेत पुढील महिन्याचा पगार धनादेशाने देण्यात येईल वा कामगारांना त्यांच्या अन्य बँक खात्याची माहिती देण्याचे परिपत्रक काढले जाईल. अन्य बँकेत खाते नसल्यास त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडण्यास सांगण्यात येणार आहे.