
>>डॉ. अनिल कुलकर्णी
पुस्तकाव्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्याला घडवू शकतात, फक्त आपण वेळ द्यायला हवा. आजच्या युगात मन मोकळं करण्यासाठी माणसांचं एकत्र येणं, संवाद साधणं हे आवश्यक बनलं आहे.
कुटुंबात मोबाइलने बोलती बंद केलीच आहे. शाळेत हाताची घडी तोंडावर बोट आजही आहे. मन मोकळं करण्यासाठी माणसे विश्वासाचे खांदे, ठिकाणं शोधत असतात, कट्टाही पसंत करतात. अशा परिस्थितीत कट्टय़ावर विचारांचं आदान-प्रदान होतं. कट्टा म्हणजे एखाद्या विषयावर हक्कानं व्यक्त होण्याचं मुक्त व्यासपीठ. अनेक कला समजून घेण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे.
‘सारेगम’ व राग कळल्याशिवाय व रियाज केल्याशिवाय गाण्यातल्या जागा कळत नाहीत. आरोह, अवरोह कळत नाहीत. गाणं कळल्याशिवाय आपण त्यात सहभागी होत नाही आणि एकदा गाणं कळलं की, सहभागाशिवाय तल्लीनता नाही याचा प्रत्यय येतो. चित्रांनाही वाचावं लागतं, तरच अर्थ लागतो. नृत्य समजल्याशिवाय ताल धरता येत नाही.
माणसांना व्यक्त होण्यास वाचन संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावते. वाचन कट्टे आज अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये सातत्य असणारे व लिहितं करणारे, बोलतं करणारे म्हणून ओळखला जाणारा डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांचा साहित्य कट्टा एकदा अनुभवायलाच हवा.
साधारण प्रत्येक महिन्याला एक विषय दिला जातो व एका लेखकाची पुस्तके वाचून त्याच्यावर 400 शब्दांत लिहून पाठवायचे व ते मंजूर झाल्यानंतर वाचन कट्टय़ावर त्याचे सादरीकरण करायचे असे या कट्टय़ाचे स्वरूप आहे. आतापर्यंत ‘माझी बस सुटली तर’, ‘वावर’, ‘पार’, ‘दिवाळी’, ‘पानगळ’, ‘वर्तुळ’, ‘लग्न’ अशा नावीन्यपूर्ण विषयांवर कथा, कविता, अलक, ललित या स्वरूपात लेख मागविले आहेत. कट्टय़ावर ‘हंस’, ‘मोहिनी’ मासिकांत 18व्या वर्षांपासून चित्र काढायला सुरुवात करणारे देश-विदेशांत चित्रप्रदर्शनात सहभाग असणारे चंद्रमोहन कुलकर्णी नुसते चित्रकारच नाही, तर लेखक म्हणूनही ओळखले जाणारे. ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकातील त्यांची ‘निर्मनुष्य चित्र’कथा याची साक्ष आहे. चित्र व कथा मनाला भिडते.
मुखपृष्ठ असो किंवा कथेवर एखादं चित्र काढायचे असो, त्यासाठी वाचन हवेच. चित्रकार कथेला पुढे नेतो. चित्रपटातील कथेत रंगत आणण्याचे श्रेय जसे दिग्दर्शकाचे असते तसेच चित्रकारालाही वेगळय़ा दृष्टीने कथा पुढे न्यायची असते. कोणतंच क्षेत्र आपल्याला वर्ज्य नसावं. नृत्य, गायन, संगीत, साहित्य, चित्र, नृत्य कळल्याशिवाय त्यांचा आस्वाद घेता येत नाही. याआधीच्या कट्टय़ावर किरण पेंद्रे, मिलिंद बोकील यांच्याशी संवाद झाला होता. मिलिंद बोकील यांच्या बऱयाच लेखांसाठी चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चित्रे काढली आहेत. लेखक आणि चित्रकार यांच्यात संवाद हवा. चित्रातलं काय कळतं…म्हणून लोक चित्राकडे दुर्लक्ष करतात. साहित्यामध्ये इतिहास, संदर्भ माहीत असेल तर अर्थ लवकर लागतो. तसंच इतर कलांचंही आहे. चित्र पाहायचं कसं, चित्रांचही परीक्षण वर्तमानपत्रांतून यायलाच हवं.
असाच संवाद प्रोज पब्लिकेशनच्या साहित्य कट्टय़ावर होतो. डॉ. ऊर्जिता कुलकर्णी व सोहम सबनीस यांना त्याचे श्रेय जाते. चांगला उपक्रम सातत्याने होत असतो. साहित्य कट्टय़ाच्या माध्यमांतून प्रोज पब्लिकेशनने अनेक लेखकांची पुस्तके प्रसिद्ध केली, जे लिहीत नव्हते त्यांना लिहितं केलं. ‘स्टोरी मिरर’वर आपला आवाजसुद्धा अनेकांनी दिला व ऑडिओ स्वरूपात त्यांच्यासुद्धा कथाही प्रसिद्ध झाल्या व त्यांना त्याची रॉयल्टीही मिळते.
तसेच येथे दिवाळी अंकांवरही चर्चा होते. प्रत्येक दिवाळी अंकाचं वाचन प्रत्येकाचे होत नाही म्हणून कोणत्या अंकात कोणता आशय आहे याचं आकलन यानिमित्ताने अनेकांना होतं.
संवादासाठी व व्यक्त होण्यासाठी लिहितं होण्यासाठी कट्टय़ाला भेट द्यायलाच हवी. पुण्यात ऑस्टिन येथे व रिकी येथे हे कट्टे भरतात.
– [email protected]





























































