
औसा तालुक्यातील भादा येथे अंगावर शहारे आणणारी घटना गेल्याच आठवड्यात घडली होती. यावेळी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. याप्रकरणी भादा पोलिसांनी 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भादा ता. औसा येथे शनिवार, दिनांक 3 रोजी कट करून बळीराम नेताजी मगर यास आधी घरी बोलावून घेण्यात आले आणि नंतर त्याच्या संपूर्ण शरीरावर मिरची पावडर टाकून त्याला दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा अमानुष प्रकार घडला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला लातूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवार, दिनांक 17 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी भादा पोलिसांनी 2 महिलांसह 7 जणांना गजाआड केले आहे. या घटनेतील हनुमंत नंदराम, संतोष नंदराम, वैजनाथ नंदराम (सर्व रा. जायफळ) तसेच निखिल फरताळे, सारिका फरताळे, भागीरथी फरताळे, चंद्रकांत फरताळे रा. भादा या 7 जणांवर भादा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची माहिती पोलिसांकडून दिली आहे.





























































