भाद्रपदी बैलपोळा उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा मोठा सण असलेला भाद्रपदी बैल पोळा शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. वर्षभर बळीराजाच्या शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा हा सण असून आज बैलांना कामात विश्रांती देऊन त्यांची पूजा करून त्यांना विविध रंग, झाली, शिंगाना तुरे लावून बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

पोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पुरणाच्या पोळीचे जेवण बनवून बैलांची विधीवत पूजा करून त्यांना ही गोडधोड नैवेद्य देण्याची परंपरा आजही जपली जात आहे. अनेक गावात आजही गावातील जुन्या पाटील मंडळींच्या बैलांना प्रथम मान देऊन नंतर इतर शेतकऱ्यांचे सजविलेले बैल गावातून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा या सणाच्या निमित्ताने जोपासली जात आहे.

कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतील बैलांचा सहभाग कमी झाला आहे. तरीही बळीराजाच्या जीवनात बैलांना त्यांचं स्थान कायम आहे. शेतक-यांच्या जोडीने शेतात राबणा-या या सच्च्या मित्राचं कॊडकौतुक करण्याचा एकमेव सण म्हणजे बैलपोळा होय. पोळयाचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे दिवस असतात. त्यांना न्हाऊ,खाऊ घालून त्यांची रंगरंगोटीकरून त्यांना सजविण्यात येते. बैल या प्राण्याबद्दल कृतद्न्य भावनांचा उत्सव म्हणजे बैलपोळा होय. शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, टाकळी हाजी, सविंदणे, मलठण आदी गावात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.