दलित-आदिवासींना शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे मनुस्मृती लागू करणे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश उपदेव, नागपूर

तोंडाला मडकं आणि कमरेला झाडू बांधायला लावणे म्हणजेच ‘मनुस्मृती’ लागू करणे होत नाही. आजच्या परिस्थितीत याचा विचार केला तर दलित-आदिवासी आणि ओबीसी या देशातील ८५ टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजेच मनुस्मृती लागू करणे होय, आणि तसे प्रयत्न सुरू झाले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.

अ.भा. सत्यशोधक समाज, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, मराठा सेवा संघ, विदर्भ तेली समाज महासंघ, भारतीय मुस्लीम परिषद, राष्ट्रीय मुस्लीम बहुजन परिषद, महात्मा फुले शिक्षण संस्था आणि विविध समविचारी परिवर्तनवादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ सत्यशोधक अ‍ॅड. एकनाथराव साळवे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. मुणगेकर म्हणाले, आज देशात महिलांचे, दलितांचे अनेक प्रश्न आहे. दोन समाजाला एकमेकांशी तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थिीत हिंदुस्थानाला एकसंघ ठेवण्याची आणि सक्षम करण्याची क्षमता केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये आहे. तेव्हा भारतीय राज्यघटना शाबूत ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एकनाथराव साळवे आपल्या अध्यक्षीय भाषणात नागपुरातील सर्व परिवर्तनवादी लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्वागतापर भाषण केले. ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. हरी नरके, आ. उल्हास पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. म. देशमुख, सत्यशोधक प्रबोधनकार सत्यपाल महाराज, गिरीश गांधी, राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ. सय्यद रफीक गफूर, मधुकर मेहकरे, डॉ. सुनील तलवारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे यांनी भूमिका विषद केली. प्रदीप शेंडे यांनी संचालन केले. अनुज हुलके यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर रमेश बोरकुटे, नागेश चौधरी, प्रा. प्रभार पावडे, अरविंद पाटील, ऋतायुष आदी मान्यवर उपस्थित होते.

साळुंखे यांना मिळावा भारतरत्न, महाराष्ट्र भूषण
यावेळी डॉ. हरी नरके यांनी आपल्या भाषणात आ.ह. साळुंखे हे सत्यशोधक महापंडित असल्याचे स्पष्ट करीत समाजाने त्यांना या नवाने संबोधावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. साळुंखे यांचे आजवरचे अफाट संशोधन पाहिले तर भारतरत्न ही पदवी त्यांच्याकडे चालून यायला हवी होती, असेही स्पष्ट केले. मधुकर मेहकरे यांनी आपल्या भाषणात आ.ह. साळुंखे यांना अजूनपर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच आम्ही आता राजकीय शक्ती निर्माण करीत असून आमचे सरकार आल्यास साळुंखे व सत्यपाल महराज यांना महाराष्ट्र भूषण देऊ असे जाहीर केले.

विदर्भाचे अपार प्रेम मिळाले – आ.ह. साळुंखे
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देतांना आ. ह. साळुंखे अतिशय भावनाशील झाले होते. ते म्हणाले मला इतरांच्या तुलनेच खूप प्रेम मिळाले. विशेषत: विदर्भाने अपार प्रेम केले. कोल्हापूर शहर सोडले तर विदर्भातच मी सर्वाधिक फिरलो असल्याचे त्यांनी सांगितले. कधी नव्हे इतका आज जाती-धर्मात दुरावा निर्माण झाला आहे. तो जोडला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.