
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला आहे. धुरामुळे गुदमरून या अर्भकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. या युनिटमध्ये एकूण सतरा अर्भके होती.
खोलीतून धूर येत असल्याचं पाहून ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितलं. तेव्हा त्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर साचून राहिला होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या SNCU मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी आऊट बॉर्न युनिटमधील 10 अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला.
मृत्युमुखी पडलेली अर्भके एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. बचावकार्यात मॉनिटरमध्ये असलेल्या सात अर्भकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
































































