अजित पवार गटाच्या नेत्याने पाडला डान्सरवर पैशांचा पाऊस

दिवाळी संपताच भंडारा जिल्ह्याला चाहूल लागते ती मंडई कार्यक्रमांची. भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मंडई कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावांमध्ये उत्साहाच वातावरण आणि पाहुण्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वर्षातून एकदा होणाऱ्या या उत्सवानिमित्त  गावांमध्ये नाटक, लावणी अशा मनोरंजनपर कार्यक्रमांच आयोजन केलं जातं. मात्र भंडाऱ्यात मंडई कार्यक्रमाच्या निमित्ताने डान्सर्सना बोलावण्यात आलं होतं. या डान्सरवर लाखों रुपये उधळण्यात आले.

तरुणींचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमाला मोहाडी पंचायत समितीचे सभापती आणि अजित पवार गटाचे नेते रितेश वासनिकही हजर होते. त्यांना या डान्सर्सचा डान्स भलताच आवडला. यामुळे त्यांनी पाठीपुढे न पाहाता या डान्सर्सवर पैशांचा पाऊस पाडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एकीकडे अजित पवार गौतमी पाटीलवर अश्लील डान्स केल्याचा आरोप करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते डान्सर्सवर पैसे उधळताना दिसत असल्याने यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. वासनिक यांनी हा पैसा आणला कुठून असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे.