भांडुपमध्ये लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्याचा एसआरए इमारतीच्या खड्ड्यात पडून मृत्यू; 10 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुप येथील मेट्रो मॉलजवळ बांधकाम सुरू असलेल्या एसआरए इमारतीच्या खड्डय़ात पडून एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भालचंद्र फाळे (25) असे मृत्यू झालेल्या वऱ्हाड्याचे नाव असून तो मातोश्री येथील सभागृहात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्यानिमित्त गुरुवारी रात्री तेथे आला होता. दरम्यान त्याचा वाचवण्यासाठी खड्ड्यात उतरलेले 10 जणदेखील जखमी झाल्याचे समोर आले आहे.

जनता मार्केटजवळ असलेल्या मेट्रो मॉललगत मातोश्री सभागृहात गुरुवारी रात्री विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी आलेला भालचंद्र फाळे हा तरुण जवळच बांधकाम सुरू असलेल्या एसआरए इमारतीच्या खड्डय़ात पडला. या घटनेनंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. भालचंद्र हा खड्ड्यात पडल्याचे उघड होताच त्याचे नातेवाईक व काही मजूर त्याला वाचवण्यासाठी खड्डय़ात उतरले. मात्र ते ज्या वस्तूवर उभे होते, ती कोसळल्याने सर्व जण खड्डय़ात पडले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत भालचंद्रासह खड्डय़ात पडलेल्या जयवंत फरसाणे, रमण यादव, श्रेयस सुर्वे, अनिकेत कदम, जयदीप शाह, संकेत जुवाटकर, आदित्य आहेर, अनिकेत पाटील, अंकित कुमार, हरिशंकर कर्वा या दहा जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र भालचंद्र याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे.