
‘गांधी’ या जगप्रसिध्द चित्रपटासाठी हिंदुस्थानातील पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या वेशभूषाकार भानू अथैय्या यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीने दिली. ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी महिला होत. भानू अथैय्या या मूळच्या कोल्हापूरच्या भानुमती राजोपाध्ये. दाक्षिणात्य वेशभूषाकार सत्येंद्र अथैय्या यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या भानू अथैय्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. भानू अथैय्या यांनी 1950 पासून जवळपास 100 चित्रपटांसाठी काम केले. ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिकाही केली होती.
राज कपूर यांच्या ‘श्री 420’ या चित्रपटापासून भानू अथैय्या यांचा वेशभूषाकार म्हणून प्रवास सुरू केला. त्यानंतर साहिब बीबी और गुलाम, गाईड, ब्रम्हचारी या चित्रपटांपासून अलिकडच्या ओम शांती ओम या चित्रपटासाठी त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले होते. भानू अथैय्या यांच्यानंतर 26 वर्षांनी संगीतकार ए. आर. रहमान, रसूल पुपुट्टी आणि गीतकार गुलझार यांनी ऑस्कर पुरस्कार मिळवला. पण अथैय्या या ऑस्कर मिळवणाऱ्या एकमेव हिंदुस्थानी महिला ठरल्या. डिसेंबर 2012 रोजी अथैय्या यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपला ऑस्कर पुरस्कार अॅकडमीकडे सोपवला.






























































